‘पांचगणी न्यूज नेटवर्क ’
भिलार : पुस्तकांचे गाव म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या भिलार (ता. महाबळेश्वर) येथे साहित्यासोबतच संगीत आणि अध्यात्माचा सुंदर संगम पाहायला मिळाला. येथील हनुमान मंदिर सभागृहात ‘ॐ सोहम्’ संगीत विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या पुढाकारातून भव्य गुरुपूजन उत्सव भक्तिमय आणि अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. गुरु-शिष्य परंपरेचा सुरेल गौरव करणाऱ्या या सोहळ्याने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती अढळ श्रद्धा, आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री. एकनाथ महाराज जाधव (गुरुजी) यांचे पाद्यपूजन व गुरुपूजन करून विद्यार्थ्यांनी भारतीय अभिजात गुरु-शिष्य परंपरेची जपणूक केली. या सोहळ्याला गुरुवर्य आनंदबुवा तुपे गुरुजी यांच्यासह सौ. कृष्णाबाई जाधव व श्री. विश्वास जाधव यांचे विशेष कृपाशीर्वाद लाभले.
या कार्यक्रमास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, प्रवीण शेठ भिलारे, शशिकांत भिलारे, रमेश शेठ चोरमले, अभय डोईफोडे आणि अशोक भिलारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान ॐ सोहम् संगीत विद्यालयातील बाल आणि तरुण कलावंतांनी सादर केलेल्या सुमधुर गायनाने संपूर्ण सभागृह भक्तिमय वातावरणाने भारून गेले. या स्वराभिषेकानंतर मृदुंग अलंकार ह.भ.प. सुहास महाराज गवळी यांनी सादर केलेल्या बहारदार सोलो मृदुंग वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना चिंतन महाराज जाधव यांनी पूर्ण कार्यक्रमात दिलेल्या अप्रतिम आणि तालबद्ध तबला साथीने कार्यक्रमाची रंगत द्विगुणीत केली. उपस्थितांनी या वादनाला टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. दिलीप महाराज गोळे व ह.भ.प. विकास महाराज भिलारे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले. शेवटी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जाधव यांनी उपस्थित मान्यवर, गुरुजन, पालक, संगीतप्रेमी नागरिक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
महाबळेश्वरच्या निसर्गरम्य परिसरात संगीत साधनेची उपासना आणि गुरुजनांप्रती समर्पित भाव यांचा प्रत्यय देणारा हा सोहळा भिलारवासीयांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला.



