Home » पांचगणी » गोडवली विकास सेवा सोसायटीला ‘तालुकास्तरीय उत्कृष्ट संस्था’ प्रथम पुरस्कार; सातारा जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत गौरव

गोडवली विकास सेवा सोसायटीला ‘तालुकास्तरीय उत्कृष्ट संस्था’ प्रथम पुरस्कार; सातारा जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत गौरव

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी, ता. 2 : सहकार चळवळीत आपल्या शिस्तबद्ध आणि पारदर्शक कारभाराचा ठसा उमटवणाऱ्या, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ऐतिहासिक महाबळेश्वर तालुक्याच्या भूमीतील गोडवली विकास सेवा सोसायटीने यशाचा आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. संस्थेच्या उत्कृष्ट आणि आदर्शवत कामकाजाची दखल घेत जिल्ह्याची अग्रगण्य अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोडवली विकास सेवा सोसायटीला ‘तालुकास्तरीय उत्कृष्ट कामकाज गौरव पुरस्कार’ प्रथम क्रमांकाने देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.

सातारा येथे ​पार पडलेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन सोसायटीचा गौरव करण्यात आला. यावेळी बँकेचे चेअरमन तथा खासदार नितीन काका पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, संचालिका ऋतुजा पाटील यांसह बँकेचे सर्व संचालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पुरस्कार गोडवली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आर. डी. मालुसरे, संचालक हनुमंत मालुसरे व इतर संचालकांनी अत्यंत अभिमानाने स्वीकारला.

गोडवली विकास सेवा सोसायटीने आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांना केंद्रस्थानी ठेवून सातत्याने पारदर्शक आणि गतिमान सेवा पुरवल्या आहेत. कर्जवाटप आणि वसुलीचे उत्तम नियोजन, नफ्यातील सातत्यपूर्ण वाढ, सभासदांना वेळेत लाभांश वाटप, उत्तम आर्थिक व्यवस्थापन आणि मुख्य म्हणजे ‘सातत्याने शंभर टक्के वसुली’चा आदर्श पायंडा या सोसायटीने घातला आहे. संस्थेच्या या आर्थिक शिस्तीमुळेच ही संस्था पाचगणी व महाबळेश्वर परिसरात अन्य संस्थांसाठी मार्गदर्शक ठरली आहे.

सोसायटीला तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील, मंत्री मकरंद आबा पाटील, संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक श्री गाढवे साहेब व व्यवस्थापक श्री. भिलारे यांनी गोडवली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आर. डी. मालुसरे, व्हाईस चेअरमन अजित मोरे, सचिव युवराज दुधाने व सर्व संचालकांचे विशेष अभिनंदन केले.

​या यशात चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, संस्था सचिव युवराज दुधाने आणि कर्मचारी वर्गाचे मोलाचे योगदान राहिले आहे. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल गोडवली विकास सेवा सोसायटीचे महाबळेश्वर-पाचगणी तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यातून आणि सहकार क्षेत्रातून जोरदार कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers