Home » पांचगणी » पर्यावरण व वृक्षसंवर्धनाचा नवा ‘ध्यास’; पांगारीत कृत्रिम पाण्याच्यासा कुंड्यांमध्ये गणेश विसर्जन करून गावाने घालून दिला नवा आदर्श

पर्यावरण व वृक्षसंवर्धनाचा नवा ‘ध्यास’; पांगारीत कृत्रिम पाण्याच्यासा कुंड्यांमध्ये गणेश विसर्जन करून गावाने घालून दिला नवा आदर्श

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी : पर्यावरण रक्षण हीच खरी ईश्वरसेवा, हा विचार कृतीत आणत महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी गावाने या वर्षी एक नवा आणि आगळावेगळा आदर्श देशासमोर ठेवला आहे. ‘पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा’ असा संदेश देत पांगारीतील ग्रामस्थांनी घरगुती श्रीगणेश मूर्तींचे मोठ्या कृत्रिम कुंडीत विधिवत विसर्जन केले. विसर्जनानंतर या कुंडीत जमा होणाऱ्या मातीमध्येच वृक्षारोपण करून त्यातून नवीन जीवनाची निर्मिती केली जाणार आहे. या स्तुत्य व नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरांतून, शासकीय व पोलिस प्रशासनाकडून तसेच समाजमनातून मोठे कौतुक होत आहे.

​गणेशोत्सवात विसर्जनानंतर होणारे पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ग्रामस्थ मंडळ पांगारी यांनी महेंद्र पांगारे व प्रबोधनकार भरत पांगारे माऊली यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला. “वृक्ष हेच जगाला ऑक्सिजन देणारे प्रत्यक्ष शंकर आहेत. निसर्ग व पर्यावरण टिकले तरच पाऊस पडेल आणि शेतकरी राजा सुखी होईल,” या भावनेतून सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत कृत्रिम पाण्याच्या कुंड्यामध्ये बाप्पाला निरोप दिला. ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ आणि ‘प्रत्येक कृती राष्ट्रहिताची व विश्वशांतीची’ या जीवनविद्या मिशनच्या तत्त्वांना अनुसरून संपूर्ण गावात स्वच्छतेचा आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला.​या अभिनव उपक्रमादरम्यान गावात मोठा उत्साह पाहायला मिळाला. या सोहळ्याला माजी सरपंच जाणू पांगारे, मंदा सुरेंद्र पांगारे, प्रवचनकार भरत पांगारे माऊली, आकाश पांगारे, महेश उंबरकर, शंकर उंबरकर, रवींद्र पांगारे, ऋतुराज राऊत, मंगेश पांगारे, महेंद्र पांगारे, गणेश पांगारे, रोहित शिंदे यांच्यासह महिला बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​”पर्यावरण हाच खरा नारायण आहे. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि सृष्टीचा भार पेलतात. श्रीगणेशाच्या विसर्जनाची माती ही अत्यंत पवित्र असते, म्हणूनच त्या मातीत वृक्ष लावून आम्ही बाप्पाचे आशीर्वाद आणि निसर्गाचे ऋण जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम प्रत्येक गावाने राबवल्यास पर्यावरणाचा मोठा समतोल राखला जाईल.”

— भरत पांगारे (माऊली), प्रवचनकार व सामाजिक कार्यकर्ते, पांगारी

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers