पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी :जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली व मुधोजी हायस्कूल, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथील ऐतिहासिक गडसोळी मैदानावर पार पडलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत संजीवन विद्यालय, पांचगणीच्या संघाने वर्चस्व गाजवले. अंतिम सामन्यात उत्कृष्ट सांघिक समन्वय, आक्रमक चढाया आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर संजीवन विद्यालयाने सातारा येथील शानबाग हायस्कूलचा ४–० अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव करत चषक उंचावला. या शानदार विजयासह संजीवन विद्यालयाने आगामी विभागीय स्तरावरील हॉकी स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व निश्चित केले आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच संजीवनच्या खेळाडूंनी मैदानावर आक्रमक पवित्रा घेत शानबाग हायस्कूलच्या बचावफळीवर सातत्याने दबाव वाढवला. उत्कृष्ट पासिंग, मध्यफळीतील वेगवान हालचाली आणि बचावफळीची भक्कम साथ यामुळे प्रतिस्पर्धी संघाला पुनरागमन करण्याची एकही संधी मिळाली नाही. राष्ट्रीय हॉकी खेळाडू तथा क्रीडा प्रमुख सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, शारीरिक क्षमता आणि नियोजनबद्ध रणनीती या विजयात निर्णायक ठरली.
जिल्हास्तरावर मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल संजीवन विद्यालय ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती शशीताई ठाकर, विश्वस्त श्रीमती अनघा देवी, अविनाश आडगे, उमेश त्रिवेदी, लीगल अॅडव्हायझर जयंत गायकवाड, आर. एस. देशमुख, पांचगणीचे नगरसेवक प्रवीण बोधे, प्राचार्य धनंजय शिरूर, IGCSE कॉर्डिनेटर क्लारिस्टा डिसिल्वा, मुख्याध्यापिका नेहा शहा, स्कूल मॅनेजर पियूष शहा, सीबीएसई एज्युकेशन ॲडव्हायझर श्री. केळकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आकांक्षा भोंगाळे, सीबीएसई कॉर्डिनेटर पौर्णिमा पाटील आणि क्रीडा विभागातील सर्व शिक्षकांनी विजयी खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे विशेष कौतुक केले.
दरम्यान, १९ वर्षांखालील मुलांची विभागीय स्तरावरील हॉकी स्पर्धा ८ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे रंगणार आहे. या स्पर्धेतही विजय मिळवून सातारा जिल्ह्याचा व विद्यालयाचा झेंडा फडकवण्यासाठी संजीवन परिवार व क्रीडाप्रेमींच्या वतीने खेळाडूंना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



