पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : शाळेच्या भिंती किती सुंदर आहेत, यापेक्षा त्या भिंतींच्या आत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काय घडत आहे? याचा थेट आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘चला शाळेत जाऊया’ अभियान २०२६–२७ अंतर्गत पंचायत समिती महाबळेश्वरच्या शिक्षण विभागाच्या वतीने अंजुमन इस्लाम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे विशेष भेट देण्यात आली. ही भेट केवळ पाहणीपुरती न राहता शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा, व्यवस्थापनाचा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ‘रिअॅलिटी चेक’ ठरली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव तथा जिल्हा नोडल अधिकारी दीपक माळी, DIET फलटणचे प्राचार्य डॉ. जितेंद्र साळुंखे, अधिव्याख्याता कोरेसाहेब व कृष्णा फरतडे, गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे व प्रतीक कडू यांच्यासह महाबळेश्वर तालुक्यातील केंद्रप्रमुख व विषय शिक्षकांनी शाळेला भेट देत विविध शैक्षणिक बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली.
शाळेचे अध्यक्ष ॲड. शौकत अली बेटगेरी आणि मुख्याध्यापिका सौ. अफरोज खान यांनी मान्यवरांचे स्वागत केले. भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी वर्गखोल्या, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक प्रगती, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, हात धुण्याची सुविधा, CWSN विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा, डिजिटल साधने तसेच संपूर्ण शाळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
मात्र या पाहणीचा केंद्रबिंदू केवळ सुविधा नव्हता. ‘विद्यार्थी नेमके काय शिकतोय?’ आणि ‘शिकलेले जीवनात कसे वापरतोय?’ या प्रश्नांभोवती शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला.
यावेळी दीपक माळी यांनी उपलब्ध शैक्षणिक साधनसुविधांचा अधिक परिणामकारक वापर करण्याचे आवाहन केले. केवळ परीक्षेतील गुण म्हणजे गुणवत्ता नसून ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास, सर्जनशीलता, संवादकौशल्य आणि मूल्यविकास हीच खऱ्या शिक्षणाची ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष द्या’
अधिकाऱ्यांनी शाळेतील सकारात्मक बाबींची नोंद घेतानाच अध्ययन निष्पत्ती वाढविण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. विशेषतः शैक्षणिकदृष्ट्या मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन, वाचन संस्कृती, भाषा कौशल्यविकास, डिजिटल शिक्षण आणि स्पर्धा परीक्षाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
शाळेतील शैक्षणिक वातावरण, व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेल्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी झाल्याने शिक्षकांनाही पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी नवी दिशा मिळाली.
‘चला शाळेत जाऊया’ अभियानाची ही भेट म्हणजे केवळ अधिकारी आले, पाहणी केली आणि निघून गेले असा औपचारिक कार्यक्रम नव्हता. शाळेतील चांगल्या कामाची दखल घेत, उणिवांवर उपाय सुचवत आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी पुढील दिशा देणारा संवाद म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे.
“सक्षम शाळा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आत्मविश्वासू विद्यार्थी — हाच ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा खरा हेतू!” या संदेशाने भेटीचा समारोप झाला.



