Home » पांचगणी » तो सिल्व्हर ओक अचानक उन्मळून पडला!

तो सिल्व्हर ओक अचानक उन्मळून पडला!

सुनील कांबळे साहेब…
तो सिल्व्हर ओक अचानक उन्मळून पडला!
पाचगणीच्या शिवाजी चौकातलं ‘अक्षर भांडार’ आता नेहमीसारखंच उघडेल.लोक येतील, तेथील साहित्य पाहतील, व्यवहार होतील. दुकानाच्या भिंतीवर रोटरीच्या पुरस्कारांच्या ट्रॉफीज तशाच मांडलेल्या असतील. एका कोपऱ्यात ‘पाचगणीचे बापू’ या लेखाची आठवण असेल. क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यासोबतचा एक फोटोही तिथेच असेल.
सगळं तिथेच असेल…
फक्त सुनील कांबळे साहेब नसतील.
दुकानात येणाऱ्या प्रत्येक परिचिताशी हसून बोलणारा चेहरा दिसणार नाही. कमरेवरची पॅन्ट पोटावर अॅडजस्ट करत एखादी मिश्कील, पण धीरगंभीर टिप्पणी ऐकू येणार नाही. एखाद्या बातमीवर चर्चा रंगणार नाही. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, पाचगणीच्या एखाद्या प्रश्नावर बोलताना अचानक गंभीर होणारा तो आवाज आता ऐकू येणार नाही.
हे सगळं लिहितानाही मन अजून ते मान्य करायला तयार नाही.कारण कांबळे साहेबांचं जाणं हे केवळ एका व्यक्तीचं जाणं नाही. पाचगणीच्या दैनंदिन आयुष्यातला एक परिचित चेहरा अचानक नाहीसा होणं आहे.
पाचगणीचे ‘बापू’ म्हणून ओळखले जाणारे दिवंगत गंगाराम कांबळे यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. पसरणी हे कुटुंबाचं मूळ गाव. मात्र बापूंनी पाचगणीला आपली कर्मभूमी केली आणि याच शहरात कांबळे साहेब लहानाचे मोठे झाले.
पाचगणीचं वेगळेपण त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या भोवती होतं. देश-विदेशातून पर्यटक येणारं हे शहर. नामांकित शैक्षणिक संस्था. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे विद्यार्थी. अधिकारी, उद्योजक, कलाकार, साहित्यिक आणि राजकीय नेत्यांची सततची वर्दळ.
सेंट पीटर्ससारख्या नामांकित शाळेत त्यांचं शिक्षण झालं. त्यांच्यासोबत शिकलेले अनेक चेहरे पुढे उद्योग, प्रशासन आणि राजकारणात मोठे झाले.
या सगळ्या वातावरणाने कांबळे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झळाळी दिली. पण त्या झळाळीपेक्षा त्यांच्या मनात रुजली ती माणसांशी जोडून घेण्याची सवय.
वडील गंगाराम कांबळे नगरपालिकेत निवडून आले, उपनगराध्यक्ष झाले. समाजात वावर वाढला आणि घरातूनच समाजकारणाचे संस्कार मिळाले.
अगदी विशीत असतानाच कांबळे साहेब रोट्रॅक्टमध्ये गेले. पुढे रोटरीत आले. अध्यक्ष झाले. आणि मग रोटरी त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली.
पाचगणी रोटरी क्लबला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या कार्यकाळातील पुरस्कार आजही ‘अक्षर भांडार’च्या भिंतीवर उभे आहेत. त्या ट्रॉफीजकडे पाहिलं की एक गोष्ट जाणवते,कांबळे साहेबांना काम करायचं होतं; फक्त पद भूषवायचं नव्हतं.
पाचगणी फेस्टिव्हलच्या आयोजनात त्यांची धावपळ असायची. सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांत ते सक्रिय असायचे. एखादी कल्पना डोक्यात आली की ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू व्हायची.
ते फार बोलायचे नाहीत; पण काम करून दाखवायचे.
‘रोटरी’चा विषय निघाला की ते भरभरून बोलायचे. सेंट पीटर्समधील विद्यार्थ्यांचा विषय निघाला की त्यांची गाडी सुसाट वेग घ्यायची. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा विषयही त्यांच्या विशेष आवडीचा. मयूर बाबा, भाईजान, ऊनवालाज, बाळासाहेब भिलारे, शशिकांत पिसाळ, लक्ष्मी कऱ्हाडकर, ॲड. उमेश सणस… ही काही नावं घेतली तरी कांबळे साहेबांच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान दिसायचं.
रोटरीसाठी हा माणूस अखंड झिजत राहिला.
अलीकडेही ते रोटरीच्या ‘सिल्व्हर ओक’ या विशेषांकाच्या कामात गुंतले होते.
पाचगणी शहराची खास ओळख असलेल्या ‘सिल्व्हर ओक’प्रमाणेच आपल्या कार्यकर्तृत्वाने तेही वेगळ्या उंचीवर पोहोचले होते.
कुणाला माहीत होतं…
आमचा हा कांबळे साहेबही सिल्व्हर ओकप्रमाणेच असा अचानक उन्मळून पडेल!
कांबळे साहेबांच्या आयुष्यातला सर्वांत वेगळा प्रयोग म्हणजे त्यांची पत्रकारिता.
इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या माणसाने मराठीत पत्रकारिता करावी, हे त्या काळात त्यांच्या जवळच्या लोकांनाही सहज पचणारं नव्हतं. त्यांचं मराठी मोडकंतोडकं होतं. लेखनासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागली.
‘दैनिक सकाळ’चे पाचगणी बातमीदार म्हणून त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी लिहिलेलं वाचून घेण्यासाठी दै. सकाळ मध्ये ‘एक खास’ माणूस असायचा.इंग्रजी माध्यमामुळे त्यांचं अक्षर मोडकंतोडकं जरूर होतं; पण त्यांनी शोधून काढलेले विषय ‘सकाळ’च्या पठडीत बसणारे, वाचकांना भावणारे आणि पाचगणीच्या वास्तवाशी जोडलेले असायचे.
हळूहळू त्यांच्या अक्षराची आणि विषयांच्या निवडीची ओळख ‘सकाळ’च्या संपादक मंडळाला झाली.आणि पाहता पाहता तीन दशकं निघून गेली.तीस वर्षं पाचगणीच्या बातम्या लिहिणं म्हणजे केवळ पत्रकारिता नव्हती. त्या काळात पाचगणी कशी बदलत गेली, याचा एक जिवंत दस्तऐवज त्यांच्या लेखणीतून तयार होत गेला.
नागरी समस्या, पर्यटन, पर्यावरण, स्थानिकांचे प्रश्न, शेतकरी, स्ट्रॉबेरी, बटाटे…
त्यांच्या बातम्यांचे विषय कधी चौकटीत अडकले नाहीत.
टेबल लँडवर उभ्या असलेल्या एका एकट्या झाडाचीही त्यांना बातमी दिसायची.
भावनिक आणि संवेदनशील मन घेऊन ते बातमीदारी करायचे.
त्यांनी कधी ‘एलो जर्नालिझम’ केली नाही; अथवा पाचगणीतील आपल्या सहकाऱ्यांना तसे करू दिले नाही.
आम्ही सह्याद्री पत्रकार संघाची स्थापना केली तेव्हा ज्येष्ठ म्हणून त्यांनाच अध्यक्षपदाचा पहिला मान दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हा पत्रकारांना समाजात मान, सन्मान आणि प्रतिष्ठा मिळत गेली.
कांबळे साहेबांचा संघर्ष फक्त समाजकारण आणि पत्रकारितेपुरता मर्यादित नव्हता.कुटुंबाच्या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवलेल्या आणि भारतात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या परदेशी नागरिक ‘शनासा’विरुद्ध त्यांनी दीर्घ कायदेशीर लढा दिला.
पंधरा-वीस वर्षांचा संघर्ष!
सामान्य माणूस कदाचित कधीच थकला असता. पण कांबळे साहेब थांबले नाहीत. त्यासाठी त्यांनी चक्क वकिलीचं शिक्षण घेतलं. न्यायालयीन लढा दिला. अखेर तो परदेशी नागरिक भारताबाहेर गेला आणि वाडवडिलांची जमीन कुटुंबाला परत मिळाली.ते हे कधी फारसं दाखवायचे नाहीत, व्यक्तही व्हायचे नाहीत. पण त्यांच्या स्वभावात एक हट्ट होता! एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण करायचंच.
वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. धाकटे बंधू अनिल यांना सोबत घेत ‘अक्षर भांडार’ आणि पारंपरिक व्यवसाय पुढे नेला.
कुटुंब, समाज, पत्रकारिता, रोटरी आणि पाचगणी… प्रत्येक ठिकाणी ते आपापली भूमिका निभावत राहिले.
राजकारणात उतरणं हा त्यांच्या आयुष्यातील आणखी एक टप्पा.
वडिलांच्या राजकीय-सामाजिक वारशाची जपणूक करण्याची त्यांची इच्छा होती. कुणीतरी त्यांना टोमणा मारला होता,‘बापूंनंतर तुमच्या घरातील कुणीच पालिकेत निवडून येऊ शकणार नाही.’
कांबळे साहेबांनी हे आव्हान स्वीकारलं.
पत्नी रेखाताईंना दोन वेळा नगरपालिकेत निवडून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावर्षी पुतण्या अमित यांच्या विजयासाठीही त्यांनी मेहनत घेतली.
स्वतः पाचगणीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली.
पण निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही.
तो पराभव त्यांना लागला.
पत्रकारिता सोडून राजकारणात आलेल्या कांबळे साहेबांसाठी हा धक्का मोठा होता. पाचगणीच्या विकासासाठी आपण काहीतरी मोठं करावं, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. पण आयुष्य कधी कधी आपल्या प्रामाणिक इच्छांनाही नकार देतं.
नगरपालिकेच्या निकालाचा तो दिवस मात्र विसरता येणार नाही.
कांबळे साहेब नगराध्यक्षपदाची निवडणूक हरले होते.
आणि त्याच वेळी त्यांचा पुतण्या अमित अटीतटीच्या लढतीत नगरसेवक म्हणून विजयी झाला होता.
शिवाजी चौकात दोघे समोर आले.
काकांच्या मनात स्वतःच्या पराभवाचं दुःख होतं. पण समोर पुतण्याचा विजय होता.
कांबळे साहेबांनी अमितला घट्ट मिठी मारली.
गुलालात रंगलेला अमित पुढे निघून गेला.
कांबळे साहेब मात्र काही क्षण तिथेच उभे राहिले.
चेहऱ्यावर हसू होतं.
डोळ्यांत मात्र पाणी होतं.
ते पाणी बराच वेळ वाहत होतं.
स्वतःच्या पराभवाचं दुःख मनात ठेवून पुतण्याच्या विजयाचा आनंद घेणं प्रत्येकाला जमत नाही.
त्या दिवशी कांबळे साहेबांमधला ‘संवेदनशील माणूस’ दिसला होता.
खरंतर, कुणी काहीही म्हणो, या पराभवानंतर कांबळे साहेब खचले.
राजकारणात येण्यासाठी त्यांनी ‘सकाळ’चा राजीनामा दिला होता. त्यामुळे परत बातमीदारी करता येत नव्हती.
गेली पंचवीस-तीस वर्षे पत्रकारितेच्या प्रेमात आकंठ बुडालेला हा अवलिया पत्रकार पत्रकारितेच्या विरहाने व्याकुळ झाला.
पत्रकारितेच्या पाण्यात उतरणं सोपं असतं; पण त्यातून बाहेर पडणं जवळपास अशक्य.
पाण्यातला मासा पाण्याबाहेर काढल्यावर जसा तडफडतो, तशीच परिस्थिती पत्रकारिता सोडलेल्या माणसाची होते.
कांबळे साहेबही त्याला अपवाद नव्हते.
माझ्यासाठी कांबळे साहेबांचं जाणं आणखी वेदनादायक आहे.सह्याद्री पत्रकार संघाच्या प्रवासात त्यांचा मोठा आधार होता. ज्येष्ठ म्हणून त्यांचा आदर होता आणि माणूस म्हणून जिव्हाळा.मी काही लिहिलं की ते वाचायचे. कधी फोन करायचे. कधी एखाद्या वाक्यावर चर्चा करायचे.
आणि शेवटी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने म्हणायचे…
‘खूप छान लिहिलंय तुम्ही सचिनराव…’
त्या एका वाक्यात कौतुकापेक्षा जास्त काहीतरी असायचं.
आपुलकी असायची.
आज मी पुन्हा एकदा एक व्यक्तिचित्र लिहितोय.
पण यावेळी ते वाचून फोन करणारे कांबळे साहेब नाहीत.
ही जाणीवच या लेखातील सर्वांत मोठं दुःख आहे.
आता पाचगणीच्या रस्त्यांवर त्यांना शोधण्याची सवय लागेल.
पाचगणीच्या निसर्गाची छायाचित्रं काढताना ते कुठेतरी दिसतील असं वाटेल. स्ट्रॉबेरी आणि बटाट्याच्या बातमीची चर्चा झाली की त्यांचं नाव आठवेल. टेबल लँडकडे पाहिलं की त्या एकट्या झाडाची कहाणी आठवेल.
रोटरीचा कार्यक्रम सुरू झाला की स्टेजवरची त्यांची जागा नजरेला शोधावीशी वाटेल.
आणि शिवाजी चौकात ‘अक्षर भांडार’ दिसलं की मन क्षणभर थांबेल.
दुकानाच्या भिंतीवरच्या ट्रॉफीज मात्र शांतपणे उभ्या असतील.
त्या कुणाशी बोलणार नाहीत.
पण बरंच काही सांगत राहतील.
काही माणसांच्या जाण्याने घर रिकामं होतं. काहींच्या जाण्याने एखादी संस्था. आणि काहींच्या जाण्याने एखाद्या शहराच्या आठवणीतच एक मोठी पोकळी निर्माण होते.
कांबळे साहेबांचं जाणं तसंच आहे.
पाचगणीने एक पत्रकार गमावला.
रोटरीने एक कार्यकर्ता गमावला.
सामाजिक क्षेत्राने एक धडपडणारा माणूस गमावला.
पण माझ्यासारख्या अनेकांनी त्यापेक्षा मोठं काहीतरी गमावलं आहे—
आपुलकीने दोन शब्द बोलणारा एक ‘आपला माणूस’.
कांबळे साहेब,
तुम्ही पाचगणीसाठी अनेक स्वप्नं पाहिली.
काही पूर्ण झाली.
काही अधुरी राहिली.
‘सिल्व्हर ओक’ही अधुराच राहिला.
पण तुमची कहाणी अधुरी राहिलेली नाही.
ती पाचगणीच्या रस्त्यांवर आहे.
तुमच्या बातम्यांमध्ये आहे.
रोटरीच्या ट्रॉफीजमध्ये आहे.
अक्षर भांडारच्या भिंतीवर आहे.
आणि आम्हा पत्रकारांच्या आठवणीत तर आहेच.
फक्त एक खंत कायम राहील…
तुम्हाला निरोप देताना तुम्ही नेहमीप्रमाणे हसून म्हणणार नाही—
‘सचिनराव, छान लिहिलंय…!’
आज हे लिहिताना डोळ्यांत पाणी आहे.
मनात एकच वाक्य घोळतंय….
जगण्याच्या प्रत्येक आव्हानाला भिडणारा माणूस आयुष्याच्या या शेवटच्या आव्हानापुढे इतक्या अचानकपणे हरावा, हे मनाला मान्य होत नाही.
पाचगणीच्या आभाळात उभा असलेला एक जुना, मजबूत सिल्व्हर ओक अचानक उन्मळून पडला आहे.
‘सावली’ मात्र अजूनही तिथेच आहे…
ती ‘सावली’…
कधीच विसरता येणार नाही.
कांबळे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— सचिन ननावरे
सह्याद्री पत्रकार संघ, पाचगणी
संपर्क ९८२३९८५२५३

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers