पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या गुरुजनांनी आपल्याला घडवून समाजात मानाचे स्थान मिळवून दिले, त्या शाळेप्रती आणि समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याचा एक आदर्श आणि कौतुकास्पद उपक्रम पांचगणी जवळील गोडवली येथील भारती विद्यापीठ हायस्कूलमध्ये पाहायला मिळाला. शाळेतील सन २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत, सध्या शिक्षण घेत असलेल्या गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करून एक प्रकारे आपल्या गुरुजनांना अनोखी गुरुदक्षिणाच दिली आहे.
स्वरा एन्टरप्रायजेसचे संचालक आणि शाळेचे माजी विद्यार्थी संदीप तुकाराम वाडकर यांच्या विशेष सहकार्यातून आणि दातृत्वातून या वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार, २७ जून रोजी सकाळी ठीक ११ वाजता अत्यंत उत्साही आणि भावूक वातावरणात या कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या परंपरेनुसार येथील विद्यार्थिनींनी उपस्थित मान्यवरांचे आणि आपल्याच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.
याप्रसंगी माजी विद्यार्थी संदीप वाडकर, विकास जंगम, अजित बेलोशे, सुशील गोळे, विकास पवार आणि जितेंद्र मालुसरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असतानाच, ऐन वेळी मिळालेल्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.
आपल्या जुन्या शाळेत पुन्हा एकदा पाऊल ठेवल्यानंतर माजी विद्यार्थी अत्यंत भावूक झाले होते. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “आज आम्ही समाजात जे काही एक जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून उभे आहोत, त्याचे सर्व श्रेय या भारती विद्यापीठ हायस्कूलला आणि येथील आदरणीय गुरुजनांना जाते. त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळेच आमच्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली. त्याच संस्कारांची आणि शाळेची कृतज्ञता म्हणून आम्ही हा छोटासा खारीचा वाटा उचलला आहे.” या वेळी त्यांनी आपल्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे सावंत सर, आबदार सर, गायकवाड सर, माने सर, आंबवडे सर, गुजरे सर तसेच तत्कालीन मुख्याध्यापक कदम सर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याबद्दल आदराची भावना व्यक्त केली.
या सोहळ्याचे औचित्य साधून शाळेतील कार्यरत शिक्षक श्री. निलेश सपकाळ, सौ. अडाटे एस. व्ही. मॅडम, सौ. मालुसरे मॅडम आणि सेवक श्री. साबळे जे. ए. यांचाही माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री. सावंत एस. एन. सर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि आभार मानले. माजी विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या सामाजिक भान आणि कृतज्ञतेचे सध्या गोडवली, पांचगणी परिसर, शिक्षक आणि पालकांकडून सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.



