पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार आणि सामाजिक क्षेत्रातील दीपस्तंभ स्वर्गीय भि. दा. भिलारे गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिलार येथे त्यांना भावपूर्ण आणि विनम्र अभिवादन करण्यात आले. भिलार येथील ‘भि. दा. भिलारे गुरुजी स्मारक’ येथे भिलारे गुरुजी स्मारक समितीच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रांतील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक मान्यवरांसह ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भि. दा. भिलारे गुरुजी यांच्या प्रतिमेचे अत्यंत भावपूर्ण वातावरणात पूजन करून त्यांना सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी उपस्थित वक्त्यांनी गुरुजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानासह त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. गुरुजींनी आमदार म्हणून काम करताना ग्रामीण भागाच्या विकासाला एक नवी दिशा दिली. दुर्गम भागातील शिक्षणाचा प्रसार आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचा हाच समृद्ध वारसा आणि संघर्षमय जीवन आजच्या तरुण पिढीसाठी कायमच प्रेरणादायी ठरेल, असा सूर या वेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.
भि. दा. भिलारे गुरुजी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून देशसेवा करताना आणि नंतर लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करताना त्यांनी प्रामाणिकपणा, कमालीचा साधेपणा आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचा एक आदर्श वस्तूपाठ घालून दिला. गुरुजींच्या याच दूरदृष्टीमुळे भिलारसह संपूर्ण महाबळेश्वर परिसराच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाल्याची कृतज्ञता यावेळी उपस्थितांनी बोलून दाखवली. त्यांच्या विचारांचा आणि समाजसेवेच्या आदर्शाचा अंगीकार करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
या स्मृतिवंदन सोहळ्याला महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती शकुंतला चोरमले, सदस्य वंदना भिलारे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण भिलारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भिलारे, जावली बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे, जावली बँकेचे संचालक अजित कळंबे, बाळासाहेब भालेघरे, वसंतराव तरडे, विश्वनाथ धनावडे, दत्तात्रय कळंबे, महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, जिल्हा बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक प्रताप धनावडे यांच्यासह विजय भिलारे, अशोक आप्पा भिलारे, दिपक भिलारे, प्रशांत भिलारे, सुभाष भिलारे, रमेश चोरमले आणि प्रवीण भिलारे, सत्यवान रांजणे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत भावपूर्ण आणि भारलेल्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता उपस्थित सर्वांच्या आभारप्रदर्शनाने झाली.



