Home » महाबळेश्वर » महाबळेश्वरच्या विकासकामांत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही! ​मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा इशारा; ‘हिरडा’ विश्रामगृहात विकासकामांचा घेतला आढावा

महाबळेश्वरच्या विकासकामांत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही! ​मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा इशारा; ‘हिरडा’ विश्रामगृहात विकासकामांचा घेतला आढावा

पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : “महाबळेश्वर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अग्रगण्य पर्यटन स्थळ आहे. येथील पायाभूत सुविधा अत्यंत भक्कम व दर्जेदार करणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असून, डॉ. साबणे रोडचे सुशोभीकरण आणि अंतर्गत रस्त्यांची कामे उच्च दर्जाचीच झाली पाहिजेत. यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा कडक इशारा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिला.

​येथील हिरडा वन विश्रामगृहात आयोजित विविध विकासकामे आणि आपत्कालीन सज्जतेच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला नगराध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्यासह
पंचायत समिती माजी सभापती संजय गायकवाड, स्वच्छता सभापती संजय जंगम, बांधकाम सभापती अफझल सुतार, शिक्षण सभापती रोहित ढेबे, महिला व बालकल्याण सभापती संगीता वाडकर, वनपरीक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते, वनपाल सुनील लांडगे तसेच नगरसेवक संतोष आखाडे, नगरसेविका विमलताई पार्टे, विद्या बावळेकर, पल्लवी कोंढाळकर, प्रियंका वायदंडे, रेश्मा ढेबे, स्मिता पाटील, अर्बन बँकेचे संचालक शरद बावळेकर व अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाडकर, यांच्यासह सर्व कामांचे मक्तेदार , प्रकल्प सल्लागार, महाबळेश्वर नगरपरिषदेचे सर्व विभागप्रमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे, वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस स्टेशन महाबळेश्वरचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

​या वेळी मंत्री पाटील यांनी महाबळेश्वरची मुख्य बाजारपेठ असलेल्या डॉ. साबणे रोड येथील सुशोभीकरणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. हे काम अत्यंत दर्जेदार आणि ठरवून दिलेल्या वेळेतच पूर्ण करण्याच्या कडक सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच जुलैच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा व आपत्कालीन व्यवस्थापनाचा सखोल आढावा घेऊन, नुकसानीचे प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.

​पर्यटनाच्या व स्थानिक नागरिकांच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तापोळा रोड, एल. सी. डिसुजा रोड आणि क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामे पावसाचा अंदाज घेऊन प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. विकासकामांत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करताना वन विभागाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सहकार्य करावे, तसेच नगरपरिषद व वन विभागाने आपसात समन्वय राखून नागरिकांची व पर्यटकांची गैरसोय टाळावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

​नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी, साबणे रोडच्या सुशोभीकरणासह अंतर्गत रस्ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगत पर्यटक व स्थानिकांना सर्वोत्तम सुविधा देण्याला प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. बैठकीच्या सुरुवातीला मुख्याधिकारी योगेश पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शिवप्रसाद धुमाळ यांनी विकासकामांचे सविस्तर सादरीकरण केले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers