Home » पांचगणी » महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघात राजकीय ईर्ष्या टोकाला; आक्षेपांची लढाई जिंकत राजेंद्रशेठ राजपुरे यांची बाजी, मोरे-राजपुरे लढतीकडे लक्ष!

महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघात राजकीय ईर्ष्या टोकाला; आक्षेपांची लढाई जिंकत राजेंद्रशेठ राजपुरे यांची बाजी, मोरे-राजपुरे लढतीकडे लक्ष!

पांचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रणसंग्रामात महाबळेश्वर तालुका विकास सेवा सोसायटी मतदारसंघ अखेरच्या क्षणापर्यंत कमालीचा चर्चेत राहिला आहे. अर्ज छाननीच्या प्रक्रियेत राजकीय नाट्य, परस्परांवरील आक्षेप आणि फोडाफोडीचे राजकारण अनुभवणाऱ्या या मतदारसंघात अखेर सत्य आणि कायदेशीर बाबींच्या जोरावर राजेंद्रशेठ राजपुरे यांनी विरोधकांचे सर्व डावपेच उलथवून लावले आहेत. खिंगर विकास सेवा सोसायटीच्या सभासदत्व प्रकरणात सहकार प्राधिकरणाकडून राजपुरे यांच्या बाजूने निकाल लागल्याने विरोधकांच्या आक्षेपांना मोठा धक्का बसला असून, आगामी संघर्षात राजपुरे यांचे पारडे कमालीचे जड झाले आहे.

​गत निवडणुकीत अत्यंत मुत्सद्दीपणे बिनविरोधची किमया साधणाऱ्या राजेंद्रशेठ राजपुरे यांना यंदाच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच अडचणीत आणण्याचे पद्धतशीर नियोजन शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात आले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांचे पडसाद या सहकार क्षेत्रातील लढतीत स्पष्टपणे उमटताना दिसत आहेत. सत्ता हस्तगत करण्यासाठी एनकेन प्रकारे उमेदवारांना प्रक्रियेतून बाद करण्याचे प्रयत्न झाले. यामध्ये विरोधी उमेदवार संजय मोरे यांनी थेट राजेंद्रशेठ राजपुरे आणि त्यांच्या पत्नी रुपालीताई राजपुरे या दोघांच्याही उमेदवारी अर्जांवर आक्षेप घेऊन त्यांना निवडणूक प्रक्रियेतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला ठरावाच्या मुद्द्यावरून तर नंतर अर्ज छाननीच्या वेळी सभासदत्वाचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून राजपुरे दांपत्याची उमेदवारी धोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र, संकटाच्या काळात संयम आणि कायदेशीर बाबींची अचूक पूर्तता करत राजपुरे यांनी हे सर्व आक्षेप फेटाळून लावत आव्हाने यशस्वीरीत्या पेलली.

​खिंगर सोसायटीच्या सभासदत्वावर घेतलेला आक्षेप फेटाळला गेल्याने आणि निकाल बाजूने आल्याने राजपुरे समर्थकांमध्ये उत्साहाचे उधाण आले आहे. विरोधकांनी निर्माण केलेला संभ्रमाचा धुरळा आता खाली बसला असून सर्वसामान्य सभासद आणि कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या संपूर्ण संघर्षाने राजपुरे यांना राजकीय वाटचालीसाठी मोठा धडा दिला असून, निष्ठेचा बुरखा पांघरून अंतर्गत कुरघोड्या करणाऱ्यांची खरी ओळख या निमित्ताने पटली असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

​दरम्यान, छाननीचा टप्पा पार पडल्यानंतर आता महाबळेश्वर मतदारसंघात राजेंद्रशेठ राजपुरे विरुद्ध संजय मोरे असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत. बहुमताचा स्पष्ट आकडा हातात नसतानाही मोरे यांनी राजपुरे आणि त्यांच्या पत्नीच्या अर्जावर आक्षेप घेत घेतलेला पंगा आणि अखेरच्या क्षणापर्यंत लढवलेली खिंड यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता ईर्ष्येची बनली आहे. बहुमताचे बळ पाठीशी असल्याने राजपुरे पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याची तयारी ठेवली आहे. आता मोरे आपला अर्ज मागे घेतात की शेवटपर्यंत रिंगणात राहून लढत देतात, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers