Home » पांचगणी » मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत बिल्लीमोरिया हायस्कूलला उपविजेतेपद; रोमहर्षक सामन्यात पाचगणीच्या संघाने कोरले यशाचे नाव

मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत बिल्लीमोरिया हायस्कूलला उपविजेतेपद; रोमहर्षक सामन्यात पाचगणीच्या संघाने कोरले यशाचे नाव

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी : क्रीडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या पाचगणीच्या बिल्लीमोरिया हायस्कूलने पुन्हा एकदा आपल्या क्रीडा कौशल्याचा दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मानाच्या ‘मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धे’मध्ये बिल्लीमोरिया हायस्कूलच्या १५ वर्षांखालील फुटबॉल संघाने अटीतटीच्या लढतीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तब्बल १६ मातब्बर संघांना मागे टाकत उपविजेतेपदावर आपले नाव कोरले. अत्यंत चुरशीच्या आणि रोमहर्षक झालेल्या या अंतिम सामन्यात बिल्लीमोरियाच्या खेळाडूंनी मैदानावर दाखवलेली जिद्द आणि चपळता उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.

 

​या संपूर्ण स्पर्धेत बिल्लीमोरिया हायस्कूलच्या संघातील शशांक कांबळे, अबीर मेहता, सार्थ कदम, दक्ष भिलारे, कार्तिक गोगरी, आरव खैरनार, रुद्र भिलारे, आदित्य आवटी, कार्तिकराज जडेजा, पानस भाटी, पहेल शर्मा, आर्यन वर्मा, दक्ष भांगरे, निधीश वरे, विवान देवकर, अथर्व मिश्रा, अभिनव शहा आणि संतोष जांबानी या खेळाडूंनी मैदानावर उत्कृष्ट ताळमेळ आणि आक्रमक चढाया करत प्रतिस्पर्धी संघांना पराभवाची धूळ चारली.

 

प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी दाखवलेला सांघिक ताळमेळ आणि बचावात्मक पवित्रा यामुळेच संघाला अंतिम फेरीपर्यंत धडक मारता आली. या उल्लेखनीय आणि शानदार यशामागे संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल कांबळे आणि विजय झोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच त्यांनी घेतलेले खडतर परिश्रम कारणीभूत ठरले.

​जिल्हापातळीवर शाळेचे नाव उज्ज्वल करून उपविजेतेपदाची चांदीची ढाल उंचावणाऱ्या या संपूर्ण बालचमूचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बिल्लीमोरिया हायस्कूलच्या एम.डी. आदिती गोराडिया , पियुष कामत सर आणि प्राचार्य सतीश गुप्ता सर यांनी संपूर्ण संघ, दोन्ही प्रशिक्षक आणि खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. पाचगणीसारख्या पर्यटन क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली क्रीडा गुणवत्ता या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, बिल्लीमोरियाच्या या विजयी वीरांवर सध्या क्रीडाप्रेमींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers