Home » पांचगणी » ​’श्री स्वामी समर्थ’ दुर्गाष्टमी मंडळाच्या भजन स्पर्धेत कुसुंबीचे काळेश्वरी भजन मंडळ ठरले प्रथम; ‘नामाचा गजर’ वाई द्वितीय तर ‘श्रीराम’ भिलार तृतीय

​’श्री स्वामी समर्थ’ दुर्गाष्टमी मंडळाच्या भजन स्पर्धेत कुसुंबीचे काळेश्वरी भजन मंडळ ठरले प्रथम; ‘नामाचा गजर’ वाई द्वितीय तर ‘श्रीराम’ भिलार तृतीय

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर पांचगणीतील श्री स्वामी समर्थ दुर्गाष्टमी उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य भजन स्पर्धेला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भक्ती, स्वर आणि तालाच्या अद्भूत संगमाने रंगलेल्या या स्पर्धेत काळेश्वरी भजन मंडळ, कुसुंबी यांनी आपल्या उत्कृष्ट आणि सुरेल सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांकाचा मान पटकावला.

​या भक्तिमय स्पर्धेत वाई येथील ‘नामाचा गजर’ प्राथमिक शिक्षक भजन मंडळाने द्वितीय, तर भिलार येथील ‘श्रीराम भजन मंडळाने’ तृतीय क्रमांक हासिल केला. याशिवाय महाबळेश्वरचे संतकृपा भजन मंडळ, जावलीचे एकदंत भजन मंडळ आणि महाबळेश्वरचे स्वरसाधना भजन मंडळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

​स्पर्धेतील वैयक्तिक नैपुण्यामध्ये राधाकृष्ण भजन मंडळ पांचगणीचे रणजित जेधिया यांनी उत्कृष्ट गायक म्हणून बाजी मारली. स्वरसाधना महाबळेश्वरचे नामदेव सपकाळ यांना उत्कृष्ट पखवाज वादक, पाडळी (ता. कराड) येथील अनिकेत अवघडे यांना उत्कृष्ट तबला वादक, तर एकदंत भजन मंडळाच्या सागर गावडे यांना उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून सन्मानित करण्यात आले.

​या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख रामचंद्र जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष आदित्य गोळे, माजी अध्यक्ष महेंद्र पांगारे, दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे आणि पत्रकार लहू चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उत्साहात झाले.

 

​पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलताना राम जाधव यांनी मंडळाच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. आपल्या संस्कृतीत भजनाचे स्थान अनन्यसाधारण असून अशा स्पर्धांमुळे तरुण पिढीमध्ये लोककला, संगीत आणि आध्यात्मिक मूल्यांची जपणूक होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

​स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नगरसेवक राजेंद्र पार्टे, माजी उपाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश गोळे, राजेश पारटे, राम जाधव, मंडळाचे अध्यक्ष रमेश साळुंखे, उपाध्यक्ष गणेश शिंदे, संतोष चिकणे, बाळू झाडे, अरुण आंब्राळे, सचिन पोळ, जितेंद्र भंडारी, गणेश काळे, नितीन सपकाळ, श्रीरंग कदम, दीपक बेलोशे, विजय पारठे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमास परिसरातील नागरिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers