Home » गुन्हा » कराड हादरले! कौटुंबिक वादातून पत्नीनेच दिली अभियंत्या पतीच्या खुनाची सुपारी; अपघाताचा बनाव रचणारा मेहुण्यासह पोलिसांच्या जाळ्यात

कराड हादरले! कौटुंबिक वादातून पत्नीनेच दिली अभियंत्या पतीच्या खुनाची सुपारी; अपघाताचा बनाव रचणारा मेहुण्यासह पोलिसांच्या जाळ्यात

पांचगणी न्यूज नेटवर्क

कराड: वैवाहिक जीवनातील कलहाने एका सुशिक्षित कुटुंबाचा कसा भयानक अंत होतो, याचा थरारक अनुभव कराड शहरात पहायला मिळाला आहे. जलसंपदा विभागातील एका ५४ वर्षीय अभियंत्याची भररस्त्यात वाहनाने चिरडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा कोणताही अपघात नसून, पत्नीनेच आपल्या भावाच्या मदतीने मुंबईतून दोन कॉन्ट्रॅक्ट किलर्सना सुपारी देऊन घडवून आणलेला थंड डोक्याने केलेला खून असल्याचे कराड शहर पोलिसांनी उघडकीस आणले आहे. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या गुन्ह्याचा छडा लावत मृत अभियंत्याची पत्नी आणि तिच्या भावाला बेड्या ठोकल्या आहेत.

​लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय ५४, रा. मनव, ता. कराड) असे खून झालेल्या दुर्दैवी अभियंत्याचे नाव आहे. तर पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले (वय ३६) व मेहुणा संग्राम दिनकर चव्हाण (वय ४०, रा. सुरूल पेठ, ता. वाळवा, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधारांची नावे आहेत.

वैवाहिक वादातून एक महिन्यापूर्वीच मुंबईत रचला कट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण मंडले आणि त्यांची पत्नी सुरेखा यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद आणि कलह सुरू होता. पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून सुरेखा हिने पतीचा काटा काढण्याचा टोकाचा निर्णय घेतला. यासाठी तिने आपला भाऊ संग्राम चव्हाण याची मदत घेतली. जवळपास महिन्याभरापूर्वी या दोन्ही बहीण-भावांनी मुंबईत जाऊन लक्ष्मण यांच्या हत्येचा संपूर्ण प्लॅन आखला आणि दोन जणांना यासाठी मोठी सुपारी दिली.

अपघात नव्हे, तर क्रूरतेची सीमा! दोनदा अंगावर घातली कार

शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कराडमधील शिंदे हॉस्पिटलसमोर ही भयानक घटना घडली. लक्ष्मण मंडले हे रस्त्यावरून जात असताना मागून आलेल्या एका बेदरकार अल्टो कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत मंडले गंभीर जखमी झाले. एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत, तर त्यांनी मंडले यांच्याजवळील बॅग आणि सामान घेऊन तिथून पळ काढला. त्यानंतर काही वेळातच ती अल्टो कार पुन्हा घटनास्थळी परतली आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंडले यांच्या अंगावर पुन्हा एकदा निर्दयीपणे गाडी घालून त्यांचा मृत्यू निश्चित केला.

पत्नीनेच दिला अपघाताचा कांगावा; पण पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने पकडली चोरी

या घटनेनंतर मृत लक्ष्मण यांच्या पत्नीने हा निव्वळ एक अपघाताचा गुन्हा असल्याचा बनाव पोलिसांसमोर केला. मात्र, घटनास्थळाची पाहणी करताना कराड पोलिसांना संशय आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी संशयाच्या सुईवरून मृत अभियंत्याची पत्नी सुरेखा हिला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच, तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

सुपारी घेणाऱ्या ‘शार्प शूटर्स’चा शोध सुरू, ५ पथके रवाना

आपल्याच बहिणीचे कुंकू पुसण्यासाठी भावाने बहिणीच्या साथीने रचलेला हा कट पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. सध्या पोलिसांनी बहीण-भावाला अटक केली असून, प्रत्यक्ष गुन्ह्यात कार वापरून हत्या करणाऱ्या त्या दोन कॉन्ट्रॅक्ट किलर्सचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी कराड शहर पोलीस ठाण्याची ३ पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) २ पथके वेगवेगळ्या भागांत रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत.

​या घटनेमुळे कराड आणि परिसरात एकच खळबळजनक वातावरण निर्माण झाले असून, एका कर्तव्यदक्ष शासकीय अधिकाऱ्याचा अशा रीतीने कौटुंबिक वादातून अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers