पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी निर्माण व्हावी, मराठी भाषेचा संवर्धित वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उदात्त हेतूने पाचगणी येथील सर आईन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘काव्यगंध पर्व सहावे’ हा दिमाखदार काव्यसोहळा रविवारी मोठ्या उत्साहात आणि साहित्यिक वातावरणात पार पडला. प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांच्या प्रमुख उपस्थितीने आणि मार्गदर्शनाने या संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आणि उंची प्राप्त करून दिली. पाचगणीसारख्या पर्यटन व शैक्षणिक नगरीत पार पडलेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर साहित्यिक अनुभवाने भारून टाकला.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांनी या वेळी बोलताना कौतुकोद्गार काढले की, सर आईन्स्टाईन अकॅडमी ही केवळ कागदोपत्री विद्यार्थी घडवण्याचे काम करत नाही, तर ‘काव्यगंध’ सारख्या सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून नवोदित कवींना उत्तम व्यासपीठ मिळवून देत भावी कवी व कवयत्री घडवण्याचे मोलाचे कार्य करत आहे. त्यानंतर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि अफाट शैलीत त्यांनी बहारदार कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या कवितांमधून व्यक्त झालेले सामाजिक वास्तव, मानवी जीवनातील संवेदना, नातेसंबंधांची वीण आणि जगण्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे रसिकांची मने जिंकली गेली. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी सादर केलेल्या प्रेरणादायी कवितांनी मुलांच्या मनात नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि विचारांची नवी क्षितिजे निर्माण केली.
या काव्यसोहळ्यात सातारा जिल्ह्यातील नामांकित कवींनीही हजेरी लावत आपल्या आशयघन रचना सादर केल्या. सामान्य माणसाचे जीवन, संघर्ष, निसर्गरम्य परिसर आणि मानवी मूल्ये यांवर आधारित कवितांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. या मोठ्या कवींच्या बरोबरीनेच सर आईन्स्टाईन अकॅडमी आणि ज्ञानगंगा हायस्कूलच्या शाळकरी विद्यार्थ्यांनीही आपल्या हटक्या अंदाजात स्वतःच्या कविता सादर केल्या. चिमुरड्यांच्या तोंडातून उमटलेली शब्दरचना आणि त्यांचेआत्मविश्वासी सादरीकरण पाहून उपस्थित रसिकांनी आणि पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना उत्स्फूर्त दाद दिली.
आजच्या डिजिटल आणि वेगवान युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि साहित्याची आवड रुजविणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. कविता ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून मानवी अंतःकरणातील भावना प्रभावीपणे मांडण्याचे ते सशक्त माध्यम आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांना विचार करण्याची दिशा मिळते आणि त्यांची संवेदनशीलता जोपासली जाते. सर आईन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूलच्या या स्तुत्य प्रयत्नांमुळे पाचगणीच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक पटलावर एक आगळावेगळा साहित्यिक मानदंड प्रस्थापित झाला आहे.
या दिमाखदार सोहळ्यास नितीन भिलारे, प्रमोद पवार, दीपक चिकणे, गोविंद कासुर्डे, महेश वाघमारे, अजय कांबळे, अनिल वन्ने, साहेबराव गोळे, विकास जाधव, अप्पा जाधव, आबा भिलारे, पत्रकार रविकांत बेलोशे, सचिन टक्के, अशोक चव्हाण, ॲड. गलांडे, सुयोग बाबर, प्रतीक्षा भोसले, सुनील लांडगे, विकास रुपणर, निहाल बागवान, किशोर कांबळे, सरोज कांबळे, रश्मी लोटेकर, अनिल रांजणे आणि समीर मुजावर यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक व शाळा परिवाराचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात आले.



