Home » गुन्हा » ​तीन वर्षांचे प्रेमसंबंध आणि हत्येसाठी सुपारी! कराडला हादरवणाऱ्या इंजिनिअर हत्याकांडातील आणखी दोन आरोपींना बेड्या

​तीन वर्षांचे प्रेमसंबंध आणि हत्येसाठी सुपारी! कराडला हादरवणाऱ्या इंजिनिअर हत्याकांडातील आणखी दोन आरोपींना बेड्या

पांचगणी न्यूज नेटवर्क

कराड/प्रतिनिधी : -अपघाताचा बनाव करून अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून हा कट रचण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणातील प्रियकरासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. न्यायालयाने दोघांनाही १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रथमेश प्रकाश थोरात (वय २५, रा. कार्वे, ता. कराड) आणि आकाश अशोक होनसुरे (वय २३, रा. कल्पतरू कॉलनी, थोरात हॉस्पिटलजवळ, कराड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्ह्यात यापूर्वीच मृत लक्ष्मण मंडले यांची पत्नी सारिका मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान उघड झालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे प्रथमेश थोरात आणि आकाश होनसुरे यांना ताब्यात घेण्यात आले. हत्येसाठी वापरण्यात आलेली अल्टो कारही पोलिसांनी जप्त केली असून, या वाहनाच्या मदतीनेच लक्ष्मण मंडले यांच्या अंगावर गाडी घालण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आकाश होनसुरे याने पैशाच्या आमिषाला बळी पडून हा प्रकार केल्याची कबुली दिली आहे. प्रथमेश थोरात याच्या सांगण्यावरून त्याने वाहन चालवत लक्ष्मण मंडले यांना लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. मूळचा कर्नाटकचा असलेला आकाश हा बीसीए पदवीधर असून, या गुन्ह्यात त्याची भूमिका नेमकी काय होती याचा सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, प्रथमेश थोरात याची कापड व्यवसायाच्या निमित्ताने सारिका मंडले हिच्याशी ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. गेल्या तीन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. लक्ष्मण मंडले हे या संबंधांमध्ये अडसर ठरत असल्याची भावना निर्माण झाल्याने त्यांना कायमचे दूर करण्याचा कट रचण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

या कटामध्ये सारिका मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांनीही सक्रिय भूमिका बजावल्याचे तपासातून पुढे आले आहे. मात्र, हत्येसाठी आकाशला नेमकी किती रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, तसेच या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का?, याचा शोध पोलीस घेत आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे करीत आहेत. या कारवाईसाठी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर आणि पोलीस उप अधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलिस ठाणे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने विशेष मेहनत घेतली.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers