Home » कराड » कराडचे शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शहापूर येथे अंत्यसंस्कार

कराडचे शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शहापूर येथे अंत्यसंस्कार

पांचगणी न्यूज नेटवर्क

कराड : शहापूर ता. कराड येथील शहीद जवान अर्जुन जाधव (वय 30)यांच्या पार्थिवावर आज शुक्रवारी शहापूर ता. कराड येथे संपूर्ण शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.यावेळी कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे, दक्षिणचे आ. डॉ. अतुल भोसले, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओमकार कापले, गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी शहीद जवान अर्जुन जाधव यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.यानंतर वीर पत्नी सायली, मुलगा सर्वेश, वीर पिता राजेंद्र, वीर माता सुरेखा, भाऊ ऋषिकेश, बहिणी रेश्मा चव्हाण पूनम पाटील यांनी अंतिम दर्शन घेतले.यानंतरशहीद अर्जुन जाधव यांच्या पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.यावेळी लष्कराचे आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी शहीद जवान जाधव यांचे पार्थिव मुंबई येथून लष्कराच्या वाहनातून शहापूर येथे आणण्यात आले. त्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश उपस्थित्यांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.कुटुंबियांनी पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अमर रहे अमर रहे, अर्जुन जाधव अमर रहे,भारत माता की जय,वंदे मातरम आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी अंत्ययात्रेत हजारो ग्रामस्थ, नातेवाईक, नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या लाडक्या भारत मातेच्या सुपुत्राला अखेरचा निरोप दिला.

कराड तालुक्यातील शहापूर गावचे जवान अर्जुन राजेंद्र जाधव (वय 30) यांना मंगळवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात वीरमरण प्राप्त झाले होते.त्यांच्या निधनामुळे शहापूर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.गुरुवारी रात्री उशिरा शाहिद जवान अर्जुन जाधव यांचे पार्थिव मुंबई येथे आणण्यात आले व तेथून ते शुक्रवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी शहापूर येथे दाखल झाले. त्यानंतर त्याच्यावरती संपूर्ण शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अर्जुन राजेंद्र जाधव हे गेल्या नऊ वर्षापासुन लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे जवान होते. सध्या काश्मीरमधील 8 आरआरमध्ये कार्यरत असतानाच उरी सेक्टरमध्ये त्यांची पोस्टिंग होती.या दरम्यान झालेल्या एका कारवाईमध्ये हॅन्ड ग्रेनेडचा स्फोट होऊन या स्फोटामध्ये जाधव यांना अन्य एका जवानाला वीरमरण आले.तत्पूर्वी जखमी अवस्थेत त्यांना तातडीने कमलकोट येथे इतर सहकाऱ्यांनी तात्काळ बचाव मोहीम राबवून दोन्ही जखमी जवानांना उपचारासाठी श्रीनगरच्या बदामीबाग येथील ‘९२ बेस लष्कराच्या हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. मात्र तत्पूर्वीच मृत्यू झाल्याने तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका भीषण आणि अचानक झालेल्या स्फोटात अर्जुन जाधव यांच्यासह भारतीय लष्कराचा आणखी एक असे दोन जवान शहीद झाले. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हे दोन्ही वीर जवान महाराष्ट्राचे सुपुत्र होते.मंगळवारी उशिरा संध्याकाळी उरी येथील कमलकोट भागात नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना हा स्फोट झाला असल्याचे लष्कराच्यावतीने सांगण्यात आले. हा स्फोट नेमका कशामुळे झाला भूसुरुंग की इतर कोणत्याही कारणामुळे याचा तपास लष्कराकडून केला जात आहे.देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अर्जुन जाधव यांच्या शौर्याला सर्व स्तरांतून सलाम करण्यात येत आहे.मात्र या घटनेमुळे संपूर्ण शहापूर गावावर शोककळा पसरली असून,वीर जवानांच्या गावी अत्यंत दुःख व्यक्त केले जात आहे.या स्फोटात वीरमरण आलेल्या दोन्ही जवानांमध्ये दुसरे वीर जवान विक्रम चव्हाण हे ऐरोली (नवी मुंबई) येथील रहिवासी होते.

मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी येत्या सोमवारी गावी यायचे गेले राहून….

अर्जुन जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.धक्कादायक बाब म्हणजे, अर्जुन जाधव यांच्या एकुलत्या एक मुलाचा येत्या 15 जून रोजी पहिला वाढदिवस आहे.लेकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अर्जुन जाधव हे 15 जूनला सुट्टी घेऊन घरी येणार होते. मात्र त्याआधीच त्यांना वीरमरण आल्याने जाधव कुटुंबासह संपूर्ण शहापूर गावावर शोककळा पसरली आहे.वडील राजू रामचंद्र जाधव,आई..सुरेखा, पत्नी सायली व दोन बहिणी,धाकटा बंधू. ऋषी, तो भारतीय नौदलात असून सध्या सुट्टीवर आहे. शहीद अर्जुनच्या मुलाचे नाव सर्वेश. वय आकरा महिने सतरा दिवस इतकेच असल्याने हि दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान,दोन्ही हुतात्मा जवानांचे पार्थिव कायदेशीर प्रक्रियेनंतर लष्करी इतमामात त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले असून गुरुवारी रात्री उशिरा ते मुंबई येथे दाखल झाले . त्यानंतर तेथून अर्जुन जाधव यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी त्यांच्या शहापूर या गावी आणण्यात आले.कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ व नागरिकांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्या नंतर त्याच्यावरती संपूर्ण शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers