Home » गुन्हा » मेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! गवडीतील २ लाखांची घरफोडी अवघ्या १२ तासांत उघड; श्वानाने दाखवली दिशा अन् दोन संशयित गजाआड!

मेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! गवडीतील २ लाखांची घरफोडी अवघ्या १२ तासांत उघड; श्वानाने दाखवली दिशा अन् दोन संशयित गजाआड!

पांचगणी न्यूज नेटवर्क

मेढा : जावळी तालुक्यातील गवडी येथे भरवस्तीत घरफोडी करून २ लाख ११ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरांना जेरबंद करण्यात मेढा पोलिसांना अवघ्या १२ तासांच्या आत यश आले आहे. मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत या गुन्ह्याचा छडा लावला. याप्रकरणी संतोष विश्वास गंगावणे (वय ३६) आणि शशिकांत संपत कांबळे (वय ३९, दोघे रा. गवडी, ता. जावळी) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

​याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मूळचे गवडी गावचे रहिवासी असलेले आणि सध्या भारतनगर, वाशीनाका (चेंबूर, मुंबई) येथे मजुरीचा व्यवसाय करणारे सुरेश जावजी गंगावणे (वय ५८) हे गावी आले होते. शुक्रवार, दिनांक १२ जून रोजी रात्री १० ते शनिवार, १३ जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घरातील बेडरूमचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चोरांनी चलाखीने सुरेश यांच्या उशाला ठेवलेल्या पँटच्या खिशातून बेडरूमची मुख्य चावी चोरली. या चावीने बेडरूम उघडून आत ठेवलेली पैशांची व दागिन्यांची पत्र्याची पेटी चोरांनी लंपास केली.

​चोरट्यांनी ही पेटी गावातीलच चंद्रकांत धनवडे यांच्या शेतात नेली. तिथे पेटीचे कुलूप तोडून त्यातील २ तोळ्यांची सोन्याची चैन (किंमत ८०,००० रुपये), अडीच तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट (किंमत १,००,००० रुपये), अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी (किंमत २०,००० रुपये) आणि ११,९०० रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ११ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला आणि पेटी तिथेच टाकून चोर पसार झाले.

​शनिवारी सकाळी हा चोरीचा प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. सुरेश गंगावणे यांनी तात्काळ मेढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सातारा येथून तात्काळ ठसे तज्ज्ञ (फिंगरप्रिंट पथक) आणि श्वान पथकाला (डॉग स्क्वॉड) पाचारण करण्यात आले.

​पोलीस श्वानाने घटनास्थळापासून माग काढत थेट गावातीलच एका परिसरापर्यंत पोलिसांना नेले. श्वान त्याच परिसरात वारंवार घुटमळल्याने आणि फिर्यादीने व्यक्त केलेल्या संशयावरून पोलिसांनी तातठीने गावातीलच संतोष गंगावणे आणि शशिकांत कांबळे या दोघांना ताब्यात घेतले.

​सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या दोन्ही संशयितांना जेव्हा मेढा पोलिसांनी आपला खाक्या दाखवला, तेव्हा त्यांचे अवसान गळाले. कसून केलेल्या चौकशीत त्यांनी चोरीचा हा गुन्हा कबूल केला. घरफोडीची ही मोठी घटना अवघ्या १२ तासांच्या आत उघडकीस आणल्यामुळे मेढा पोलिसांच्या कार्यतत्परतेचे जावळी तालुक्यात मोठे कौतुक होत आहे.

​सदरची धडाकेबाज कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विकास गंगावणे करत आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers