Home » कराड » कराडजवळ भीषण अपघात: गणपतीपुळेला देवदर्शनासाठी निघाल्या होत्या ३ गाड्या; कार पलटी होऊन तरुण अभियंत्याचा जागीच मृत्यू, दोघे जखमी!

कराडजवळ भीषण अपघात: गणपतीपुळेला देवदर्शनासाठी निघाल्या होत्या ३ गाड्या; कार पलटी होऊन तरुण अभियंत्याचा जागीच मृत्यू, दोघे जखमी!

पांचगणी न्यूज नेटवर्क

मसूर : शनिवार-रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी निघालेल्या तीन तरुण अभियंत्यांच्या  कारला पंढरपूर-मल्हारपेठ राज्य महामार्गावर रविवारी पहाटे पावणेएक वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. वडोली भिकेश्वर (ता. कराड) गावच्या हद्दीतील कवठे फाटा परिसरात भरधाव कारवरील ताबा सुटल्याने ती तब्बल ३०० फूट अंतरावर शेतात जाऊन अनेक पलट्या खात कोसळली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेत कारचालक तरुण अभियंता ओंकार अनिल खंडागळे (वय २३, सध्या रा. पाटण, मूळ रा. बीड) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर कारमधील अन्य एक अभियंता गंभीर आणि दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.

​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार खंडागळे, हरिश सुरेश वाघमारे (रा. पडळ, ता. खटाव) आणि प्रतिक रमेश धावणे (रा. चंद्रपूर) हे तिघेही एका खाजगी बांधकाम कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत होते. रविवारी सुट्टी असल्याने ते शनिवारी रात्री ओंकार यांच्या शेव्हरेलो क्रुज कारने गणपतीपुळेकडे जाण्यास निघाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास कवठे फाट्यावरील धोकादायक वळणावर वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट शेतात जाऊन कोसळली. अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

​अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना कारबाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच मसूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले आणि हवालदार बाळासाहेब कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या ओंकार खंडागळे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. गंभीर जखमी प्रतीक धावणे यांच्यावर कराडच्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers