Home » पांचगणी » पाचगणी पालिकेचा ‘हिलदारी’सोबत मान्सून स्पेशल मास्टरप्लॅन; टेबललँड स्वच्छ, तर संजीवन नाका परिसरात ६५ बालचमुंकडून २१०० सीडबॉलचे विखुरण!

पाचगणी पालिकेचा ‘हिलदारी’सोबत मान्सून स्पेशल मास्टरप्लॅन; टेबललँड स्वच्छ, तर संजीवन नाका परिसरात ६५ बालचमुंकडून २१०० सीडबॉलचे विखुरण!

पाचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी : निसर्गाचे वरदान लाभलेल्या पाचगणी गिरीस्थान शहरात मान्सूनचे आगमन झाले असून, या पार्श्वभूमीवर शहराचे सौंदर्य आणि पर्यावरण टिकवून ठेवण्यासाठी पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणित ‘हिलदारी’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य स्वच्छता आणि हरित मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ‘सुंदर पाचगणी, स्वच्छ पाचगणी’ आणि ‘जबाबदार पर्यटन’ हा संदेश देणाऱ्या या उपक्रमांमध्ये स्थानिक विद्यार्थी, व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

​पाचगणीचे मुख्य आकर्षण असलेल्या आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या ‘टेबललँड’ पठारावर आणि ऐतिहासिक ‘पांडवांची चूल’ परिसरात टेबललँड व्यापारी असोसिएशनच्या सहकार्याने एक विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते, त्यामुळे हा परिसर प्लास्टिकमुक्त राखण्यासाठी २५ स्वयंसेवकांनी कंबर कसली होती. या मोहिमेत संपूर्ण परिसरातून सुमारे १२० किलो कचरा गोळा करण्यात आला, तर एकट्या पांडवांची चूल क्षेत्रातून तब्बल २ पोती प्लास्टिक व इतर कचरा संकलित केला गेला. या मोहिमेमुळे येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये जबाबदार पर्यटनाविषयी जनजागृती झाली असून, अनेक पर्यटकांनी प्रत्यक्ष स्वच्छतेत हातभार लावत या उपक्रमाचे कौतुक केले. या मोहिमेला टेबललँड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर के. बगाडे, सचिन जानकर, राजेश बगाडे, निलेश मोरे, जोसेफ फर्नांडीस व सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

​संजीवनच्या विद्यार्थ्यांचा हरित संकल्प; ‘सीड बॉल थ्रोईंग’ने संजीवन नाका परिसर दणाणला!

स्वच्छतेच्या या महायज्ञानंतर संजीवन विद्यालयाच्या ६५ हून अधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा वसा हाती घेत संजीवन नाका मैदान परिसरात ‘सीड बॉल थ्रोईंग’ (बीजगोळे विखुरणे) उपक्रम अत्यंत उत्साहात राबवला. पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन हे बीजगोळे भविष्यात मोठ्या वृक्षांमध्ये परावर्तित व्हावेत आणि पाचगणीची हरित संपत्ती वाढावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी हे सीडबॉल परिसरात विखुरले. यानंतर विद्यार्थ्यांनी संजीवन नाका ते गणेश पेठ रोड या मार्गावर स्वच्छता मोहीम राबवत रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा गोळा केला आणि स्थानिक नागरिकांना ओला-सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून दिले.

​या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनात प्रत्येक नागरिकाची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर प्रकाश टाकला. या मोहिमेला पाचगणी नगरपरिषदेच्या आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, सुरेश मडके, पत्रकार संघाचे सचिन टक्के, रविकांत बेलोशे, लहू चव्हाण यांच्यासह संजीवन विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकवृंद उपस्थित होते. मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरणदूत बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

​हा संपूर्ण उपक्रम पाचगणीचे नगराध्यक्ष श्री. दिलीपभाऊ बगाडे, आरोग्य सभापती राजश्री सणस, मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील व सर्व नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाला. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हिलदारी टीमचे गणेश शेडगे, शुभम महाजन, निखील खरात, दीपाली धनावडे, प्राजक्ता बोडरे व ईश्वरी पिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच राबवलेला हा स्तुत्य उपक्रम पाचगणीला अधिक देखणी आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers