Home » पांचगणी » पाचगणीत ५० हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी : नगरपरिषद व हिलदारीचा स्तुत्य उपक्रम; पावसाळी आजारांबाबत विशेष मार्गदर्शन

पाचगणीत ५० हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी : नगरपरिषद व हिलदारीचा स्तुत्य उपक्रम; पावसाळी आजारांबाबत विशेष मार्गदर्शन

पाचगणी न्यूज नेटवर्क 

पांचगणी : अहोरात्र राबून पाचगणी शहर कचरामुक्त ठेवणाऱ्या सफाई मित्रांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सामाजिक जबाबदारी आहे. हेच ओळखून पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद, नेस्ले प्रणित ‘हिलदारी’ प्रकल्प आणि स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार आणि आरोग्याशी संबंधित इतर समस्या लक्षात घेऊन या शिबिराला प्राधान्य देण्यात आले.

​या विशेष आरोग्य शिबिराचा लाभ पाचगणी नगरपरिषदेच्या ५० हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांनी घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने सर्व कर्मचाऱ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब (बीपी), रक्तातील साखरेचे प्रमाण (शुगर), हिमोग्लोबिन, श्वसनाशी संबंधित त्रास तसेच पावसाळ्यात ओले राहिल्यामुळे होणारे त्वचेचे आजार यांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजू कर्मचाऱ्यांना मोफत औषधोपचार आणि आवश्यक त्या वैद्यकीय गोळ्यांचे वितरणही करण्यात आले.

​कार्यक्रमा दरम्यान हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले की, “स्वच्छता करताना कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. पावसाळ्यात वैयक्तिक स्वच्छता राखणे, गरम व स्वच्छ पाणी पिणे आणि आजारपण अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.”

​या आरोग्य शिबिराचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे आणि मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी विशेष कौतुक केले. शहराला सुंदर ठेवणाऱ्या या हातांना आरोग्याच कवच देणारा हा उपक्रम अत्यंत वेळेत आणि योग्य पद्धतीने राबवला गेल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. आरोग्य विभागाच्या या तत्परतेमुळे सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers