पांचगणी न्यूज नेटवर्क
वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक मोठी आणि धडक कारवाई करत विनापरवाना दूध संकलन व वाहतूक करणाऱ्या तब्बल सहा वाहनांवर एकाच वेळी छापे टाकले. या धडक कारवाईत पथकाने ६ वाहनांमधील दुधाचे एकूण १२ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील दूध व्यवसायात प्रचंड खळबळ उडाली असून, बेकायदेशीर दूध व्यवहारांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.
कारवाईदरम्यान पकडण्यात आलेल्या वाहन चालकांकडे दूध संकलन किंवा वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना नसल्याची धक्कादायक बाब प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. विशेष म्हणजे, संकलित केलेल्या दुधाची कोणतीही गुणवत्ता अथवा भेसळ तपासणी न करताच हे दूध थेट शहरातील नामांकित विविध डेअरींकडे पाठविले जात होते. सर्वसर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या दुधाची कोणतीही चाचणी न करता त्याचा पुरवठा होत असल्याबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा विनापरवाना दुधामुळे भविष्यात लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला, तर याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
कारवाईत आढळलेला मुद्देमाल आणि दुधाचा साठा:
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने विविध वाहनांमधून मोठ्या प्रमाणात दूध जप्त केले आहे. यामध्ये नामदेव महादेव नवघने (रा. वासोळे) यांच्या वाहनातून २६५ लिटर (६५ लिटर गायीचे, २०० लिटर म्हशीचे) दूध जप्त केले, जे वाई येथील नियती डेअरीकडे चालले होते. आत्माराम शिवाजी चिकणे (रा. वडवली) यांच्या वाहनातून ३०० लिटर (१२० लिटर गायीचे, १८० लिटर म्हशीचे) दूध आढळले, हे दूध श्रीकृष्ण डेअरी येथे जाणार होते. प्रकाश तुकाराम गावडे (रा. वाई) यांच्या वाहनातून २६० लिटर दूध मिळाले, जे खामकर डेअरी, वाई येथे जमा होणार होते.
तसेच अजित दत्तात्रय चोरट (रा. कोंढवळी) यांच्या वाहनातून तब्बल ४४० लिटर दूध जप्त करण्यात आले असून, ते भैरवनाथ दूध, पसरणी येथे जाणार होते. ओंकार शिवाजी सणस (रा. वेलंग) यांच्या वाहनातून १६० लिटर दूध आढळले, हे दूध श्रीकृष्ण डेअरीकडे चालले होते. तर प्रदीप प्रकाश जाधव (रा. वेलंग) यांच्या वाहनातून २२० लिटर दूध जप्त करण्यात आले, जे खामकर दूध डेअरी, वाई येथे जात असल्याचे चालकाने सांगितले.
‘लहानांवर कारवाई, मोठ्यांना अभय का?’ नागरिकांचा सवाल
काही दिवसांपूर्वी वाई शहरातील पानटपऱ्यांवर कारवाई करून प्रशासनाने मोठी मोहीम राबवल्याचा दावा केला होता. मात्र, थेट आरोग्याशी खेळणाऱ्या दूध व्यवसायातील या बेकायदेशीर साखळीवर आतापर्यंत प्रभावी कारवाई का झाली नाही, असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात होता. अखेर या धडक मोहिमेत सहा वाहने पकडली गेली असली, तरी या साखळीतील मुख्य सूत्रधार आणि मोठ्या डेअरी चालकांची चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ गरीब वाहनचालकांवर कारवाई करून हे प्रकरण दाबले जाऊ नये, तर विनापरवाना आणि विनाचाचणीचे दूध स्वीकारणाऱ्या संबंधित डेअरींचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दोषी डेअरींवरही होणार कठोर कारवाई:
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी ए. ए. वायकुळे, प्रियांका वाईकर, रुपाली खापणे आणि ओंकार शिंदे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. सहाय्यक आयुक्त शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर आणि चौकशीत नियमभंग आढळल्यास, हे बेकायदेशीर दूध स्वीकारणाऱ्या संबंधित डेअरींवरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. वाई तालुक्यातील या मोठ्या कारवाईमुळे अन्नसुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पुढील तपासातून कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



