पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : जावळी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार अतिवृष्टीचा मोठा फटका निसर्गाला बसला आहे. काल रात्री हातगेघर येथील बस स्थानकाजवळ, काळेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सुमारे १५० ते १६० वर्षे जुने असलेले एक महाकाय पिंपळाचे झाड मुसळधार पावसामुळे उन्मळून कोसळले. पिढ्यानपिढ्या ज्या वृक्षाने गावाला मायेची सावली दिली, तो हक्काचा विसावा एका क्षणात भुईसपाट झाल्याने संपूर्ण हातगेघर गावावर आणि परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व:
हे केवळ एक झाड नव्हते, तर हातगेघर गावचा एक जिवंत इतिहास आणि अनेक पिढ्यांचा साक्षीदार होता. विशेष म्हणजे, याच ऐतिहासिक झाडाच्या अगदी समोर कष्टकऱ्यांचे नेते, दिवंगत माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांचा जिल्ह्यातील पहिला भव्य पुतळा दिमाखात उभा आहे. या पुतळ्याला लागूनच असलेल्या या महाकाय वृक्षाभोवती ग्रामस्थांनी एक सुंदर पार (कट्टा) बांधला होता. हा पार म्हणजे गावाचा मुख्य कट्टा आणि संवादाचे केंद्र बनला होता.
गावाचा हक्काचा विसावा हरपला:
कडक उन्हाळ्यात संपूर्ण परिसराला थंडगार सावली देणारे हे झाड अनेकांच्या विसाव्याचे ठिकाण होते. कडाक्याच्या उन्हात किंवा सायंकाळच्या वेळी गावातील ज्येष्ठ नागरिक येथे घटकाभर गप्पा मारण्यासाठी जमत, तरुण मंडळी एकत्र येत, तर एसटी बसची वाट पाहणारे प्रवासी याच झाडाच्या छायेत आसरा घेत असत. अनेक प्रवाशांचा थकवा या पिंपळाच्या थंड हवेने दूर होत असे. उन्हातान्हात हक्काची सावली देणारा हा निसर्गाचा आधारवडच आता कोसळल्याने, आमचा विसावा हिरावून घेतला गेल्याची भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की, या महाकाय वृक्षाचे अवाढव्य मूळ मातीसह उखडून निघाल्यामुळे हे झाड रस्त्यावर कोसळले. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे आणि त्यावेळी परिसरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, ज्या पिंपळाने दीड-दोनशे वर्षे गावाला सावलीचे छत्र दिले, त्या जुन्या जाणत्या वृक्षाचे असे अचानक जाणे हातगेघरकरांच्या मनाला चटका लावून गेले आहे. एका महाकाय वनस्पतीचा अंत झाल्याची नाही, तर घरातील एका ज्येष्ठ सदस्याची साथ सुटल्याची भावना आज प्रत्येक हातगेघर ग्रामस्थाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.



