Home » पांचगणी » Panchgani news : “सेंट झेवियर्सच्या मैदानातून ‘धबधबा’, सिद्धार्थनगरचा रस्ता झाला जलमार्ग!”

Panchgani news : “सेंट झेवियर्सच्या मैदानातून ‘धबधबा’, सिद्धार्थनगरचा रस्ता झाला जलमार्ग!”

 

पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे

पांचगणी : पावसाच्या पहिल्याच जोरदार सरींनी पाचगणीतील सिद्धार्थनगरचा मुख्य रस्ता अक्षरशः जलमार्गात बदलला आहे. सेंट झेवियर्स शाळेच्या मैदानातील पावसाचे पाणी निचऱ्याची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने थेट रस्त्यावर कोसळत असून, नागरिकांना रस्त्याऐवजी वाहत्या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.

रस्त्यावरून मोठ्या वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना या प्रवाहातून जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. काही ठिकाणी पाण्यामुळे रस्त्याखालील खड्डे दिसत नसल्याने अपघाताची शक्यता अधिकच वाढली आहे.

स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, “सेंट झेवियर्ससारख्या मोठ्या संस्थेच्या मैदानातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?” वर्षानुवर्षे ही समस्या कायम असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून केवळ पाहणीचे आश्वासन मिळते; मात्र कायमस्वरूपी उपाय अजूनही झालेला नाही.

विशेष म्हणजे, जर पुढील काही दिवस मुसळधार पाऊस सुरू राहिला, तर हेच पाणी सिद्धार्थनगरमधील घरांमध्ये घुसण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासन एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवालही परिसरातून उपस्थित होत आहे.

पांचगणी नगरपालिकेने तातडीने या ठिकाणी पाहणी करून पावसाच्या पाण्याचा स्वतंत्र निचरा, गटार व जलवाहिनीची व्यवस्था करावी, अन्यथा नागरिकांच्या संतापाचा पूरही याच पाण्याबरोबर वाहू लागेल, अशी तीव्र मागणी स्थानिकांनी केली आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers