पांचगणी न्यूज नेटवर्क
पुणे : साहसी क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठेच्या ‘सह्याद्री ऑफ रोड चॅलेंज’ (SOC – Chapter 6) च्या ६ व्या पर्वात पाचगणीच्या सुपुत्रांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ३, ४ आणि ५ जुलै २०२६ दरम्यान पुणे जवळील सह्याद्रीच्या कुशीत पार पडलेल्या या अत्यंत आव्हानात्मक आणि थरारक महामुकाबल्यात, पाचगणीचे अनुभवी चालक प्रताप कऱ्हाडकर आणि त्यांचे सह-चालक कालिदास डोंगरे यांनी आपल्या प्रसिद्ध ‘जिप्सी’ गाडीसह दुर्गम ट्रॅकवर अधिराज्य गाजवत ‘किंग ऑफ द रिंग’ प्रकारात ‘सेकंड रनर-अप’ (द्वितीय उपविजेतेपद – तिसरे स्थान) पटकावले आहे. मुख्य बक्षिसांची स्क्रुटिनी प्रक्रिया सुरू असतानाच, त्यांच्या या अत्यंत मानाच्या ट्रॉफीची घोषणा झाल्याने पाचगणीकरांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
अडथळ्यांची शर्यत आणि जिप्सीचा थरार
सह्याद्री पर्वत रांगांच्या कठीण भूप्रदेशात आयोजित करण्यात आलेल्या या ३-दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत देशभरातून स्टॉक, सेमी-मॉडिफाईड आणि शक्तिशाली ४x४ मॉन्स्टर वाहने दाखल झाली होती. चिखलाचे साम्राज्य, निसरडे रस्ते, खडी चढण आणि खोल दऱ्या अशा चालकांचा कस पाहणाऱ्या ट्रॅकवर वाई-महाबळेश्वर परिसराचा दांडगा अनुभव पाठीशी असलेल्या कऱ्हाडकर आणि डोंगरे या जोडीने अप्रतिम ड्रायव्हिंग स्किल्सचे प्रदर्शन केले. ‘किंग ऑफ द रिंग’ सारख्या अत्यंत कठीण आणि वेगवान ट्रॅकवर आपल्या अचूक टायमिंगच्या जोरावर त्यांनी मातब्बर स्पर्धकांना मागे टाकत या मानाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
निकाल आणि बक्षिसांची उत्सुकता शिगेला
रविवार, ५ जुलै रोजी या स्पर्धेची सांगता झाली असून, अंतिम गुणतालिका आणि इतर बक्षिसांची अधिकधिक स्क्रुटिनी प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. कऱ्हाडकर व डोंगरे यांनी मिळवलेल्या या यशानंतर आता मुख्य स्पर्धेत ते नेमकी कोणती रँक मिळवतात, याचा अंतिम तक्ता उद्या सकाळी ‘Sahyadri Offroad Challenge’ च्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर प्रसिद्ध केला जाईल. या स्पर्धेतील विजेत्यांना ‘Swastik Fabs’ कडून अत्याधुनिक ‘Lambda Locker’ सिस्टीम, तसेच ‘YST Tyres’ व ‘Sri Maruthi Tyres’ कडून हेवी-ड्यूटी स्टील रिम्स बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत.
पाचगणीत आनंदाचे वातावरण; सर्व स्तरांतून अभिनंदन
ऑफ-रोड मोटरस्पोर्ट्समध्ये पाचगणीसारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या प्रताप कऱ्हाडकर आणि कालिदास डोंगरे यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘किंग ऑफ द रिंग’ची सेकंड रनर-अप ट्रॉफी स्वीकारतानाचा त्यांचा गौरव पाचगणीकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला असून, सामाजिक, राजकीय, क्रीडा आणि पत्रकारिता क्षेत्रासह सर्वच स्तरांतून या दोन्ही वीर सुपुत्रांचे उत्स्फूर्त अभिनंदन केले जात आहे.



