Home » सातारा » सातारा जिल्ह्यातील ‘या’ ५ तालुक्यांमधील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

सातारा जिल्ह्यातील ‘या’ ५ तालुक्यांमधील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

पांचगणी न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि दुर्गम भागात सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या बेफाम पावसामुळे आणि हवामान खात्याने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या पाचही तालुक्यांमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, मंगळवार दिनांक ७ जुलै २०२६ रोजी एक दिवसाची जाहीर सुट्टी घोषित केली आहे.

​भारतीय हवामान विभागाने (IMD) ७ जुलै रोजी या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, डोंगरदऱ्या आणि नदी-नाल्यांमधील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेक सखल भागांत पाणी साचल्याने तसेच दुर्गम व ग्रामीण मार्गांवर दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक बनू नये, म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत हा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार संबंधित पाच तालुक्यांमधील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी माध्यमांच्या अंगणवाड्या, बालवाड्या, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह महाविद्यालये उद्या पूर्णपणे बंद राहतील.

​पाचगणीतील इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांवर प्रशासनाची नजर; आदेश डावलल्यास कारवाई!

जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश सर्व प्रकारच्या व्यवस्थापनाच्या शाळांना लागू केला असला, तरी पाचगणी (ता. महाबळेश्वर) परिसरातील काही नामांकित इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा अशा प्रकारच्या आणीबाणीच्या परिस्थितीतही शाळा बंद ठेवत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. मुसळधार पावसात विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात येत असतानाही व्यवस्थापनाकडून शाळा सुरू ठेवण्याचा आडमुठेपणा केला जातो, अशी ओरड दरवर्षी स्थानिक पातळीवरून होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळच्या आदेशात सर्व खाजगी शाळांचा स्पष्ट उल्लेख केला असून, शाळा प्रशासनाने या आदेशाचे तात्काळ व काटेकोरपणे पालन करावे, अशा कडक सूचना दिल्या आहेत. आदेश डावलून शाळा सुरू ठेवणाऱ्या पाचगणीतील इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांवर शिक्षण विभाग आणि तहसीलदार काय कारवाई करणार, याकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers