पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : पदे अनेकांना मिळतात; मात्र आपल्या नि:स्वार्थ कार्याने समाजाच्या मनात आदराचे स्थान मिळवणारे व्यक्तिमत्त्व विरळाच असते. सातत्याने समाजसेवा, गरजूंना मदतीचा हात, शिक्षणाची ज्योत आणि महिला सक्षमीकरणासाठी आपले आयुष्य वाहिलेल्या पाचगणी येथील ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या स्वाती महेश बिरामणे यांच्या कार्याचा एक मोठा गौरव झाला आहे. त्यांची प्रतिष्ठित अशा ‘इनर व्हील क्लब’च्या डिस्ट्रिक्ट आयएसओ (International Service Organiser) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने प्रसिद्ध पर्यटनस्थळ पाचगणीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध सामाजिक, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्वाती बिरामणे यांनी आजवर समाजकार्यात केवळ औपचारिकता म्हणून सहभाग नोंदवला नाही, तर अनेक गरजू कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा दीप प्रज्वलित केला आहे. संकटाच्या काळात धावून जाणे, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, शालेय साहित्याचे वाटप, वंचित महिलांना आत्मनिर्भरतेसाठी प्रोत्साहन देणे आणि आरोग्य व सामाजिक जनजागृतीच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मानवतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे. त्यांच्या याच दातृत्वाची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या इनर व्हील क्लबने घेतली आहे.
स्वाती मॅडम यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी अनेक नावीन्यपूर्ण आणि लोकाभिमुख सामाजिक उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क, अचूक नियोजन, शिस्त आणि प्रभावी संघटन कौशल्य या गुणांमुळे त्या नेहमीच सर्वांच्या विश्वासास पात्र ठरल्या आहेत. प्रत्येक उपक्रमात “समाज प्रथम” हाच विचार केंद्रस्थानी ठेवून त्यांनी पाचगणी आणि परिसरातील अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
आता इनर व्हील क्लबच्या ‘डिस्ट्रिक्ट आयएसओ’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील समन्वय पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, त्यांच्या माध्यमातून क्लबचे सेवा प्रकल्प अधिक व्यापक होतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. आगामी काळात महिला व बालविकास, ग्रामीण शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवा प्रकल्पांमध्ये स्वाती बिरामणे यांच्या अनुभवाचा मोठा फायदा संस्थेला आणि समाजाला होणार आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल पाचगणीतील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, “स्वाती बिरामणे यांच्या संघटन कौशल्याने आणि सेवाभावी वृत्तीने इनर व्हील क्लबचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उंचीवर पोहोचेल. त्यांचे कार्य नवीन पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.” समाजासाठी सतत झटणाऱ्या एका खऱ्या आणि संवेदनशील कार्यकर्त्याचा झालेला हा सन्मान म्हणजे सामाजिक उत्तरदायित्वाचा गौरव असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.



