पांचगणी न्यूज नेटवर्क
कराड : शेतात पाणी पाजण्यासाठी विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना किरपे, ता. कराड येथे मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
बाळासाहेब पंढरीनाथ देवकर (वय ५२, रा. किरपे, ता. कराड) असे शॉक लागून मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, किरपे, ता. कराड येथील वांग नदीच्या काठावर बेली नावाच्या शिवारात असलेलया शेतास बाळासाहेब देवकर हे मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाणी पाजण्यासाठी गेले होते. वांग नदीकाठी असलेली विद्युत मोटार सुरु करण्यासाठी ते गेले असता मोटारीला हात लावला असता त्यातून सुरु असलेल्या वीज प्रवाहाचा धक्का त्यांना लागला. यावेळी विजेचा जोरात लागलेल्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, त्या परिसरातून निघालेल्या काही शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर गावातील ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी कोळे पोलीस स्टेशनच्या पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर कोळे पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार एन. एस. कुचेकर, किरपे गावचे पोलीस पाटील प्रवीणकुमार तिकवडे, महादेव देवकर, संभाजी देवकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
कोळे पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार एन, एस. कुचेकर यांच्यासह पोलीस पाटील प्रवीणकुमार तिकवडे यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत कराड तालुका पोलिसात करण्याचे काम सुरु होते.



