Home » महबळेश्वर » रुग्णांशी उर्मट वर्तन करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा! ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा’ची महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात धडक

रुग्णांशी उर्मट वर्तन करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा! ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा’ची महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात धडक

पांचगणी न्यूज नेटवर्क

महाबळेश्वर : गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना हक्काचा आधार देणाऱ्या ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, महाबळेश्वर’ टीमने आज येथील मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालयात धडक दिली. रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने रुग्णाशी केलेल्या अत्यंत अयोग्य आणि उर्मट वर्तणुकीबाबत येथील व्यवस्थापक अधिकारी श्री. अमराळे सर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी व सविस्तर तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर येथील मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या एका गरजू रुग्णासोबत तेथील कार्यरत डॉ. प्रकाश खडसरे यांनी अत्यंत उर्मट, असंवेदनशील आणि अयोग्य वर्तन केले. ही बाब ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, महाबळेश्वर’च्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर येताच, त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली.

​”रुग्णांशी सन्मानपूर्वक, आपुलकीने आणि संवेदनशीलतेने वागणे ही प्रत्येक डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची प्राथमिक कर्तव्य व जबाबदारी आहे. मात्र, जबाबदार पदावर असूनही रुग्णांना अशी हीन वागणूक दिली जात असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही,” अशा शब्दांत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रतिनिधींनी तीव्र संताप व नाराजी व्यक्त केली.

​शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाचे व्यवस्थापक अधिकारी श्री. अमराळे सर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर रुग्णांची कैफियत मांडली. सर्वसामान्य जनतेला वेळेत आणि योग्य उपचार मिळणे हा त्यांचा हक्क असून, रुग्णालयातील अशा प्रकारच्या मनमानी कारभारामुळे गोरगरिबांनी न्याय कुणाकडे मागावा, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

​या आंदोलनानंतर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आमचे काम केवळ दाखवण्यापुरते किंवा प्रसिद्धीसाठी नसून, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रत्यक्ष जमिनीवर सोडवण्यासाठी आम्ही शिवसेनेत आहोत.

​’रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून महाबळेश्वर येथील प्रत्येक नागरिकाला व रुग्णाला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आमची टीम २४ तास कटिबद्ध आहे. भविष्यातही रुग्णांच्या हक्कांवर गदा आल्यास शिवसेना स्टाईलने जाब विचारला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers