Home » जावळी » दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयाच्या गुणवत्तेच्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा; सार्थक गोळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयाच्या गुणवत्तेच्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा; सार्थक गोळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

पांचगणी न्यूज नेटवर्क

​ दापवडी :कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेव संचलित, दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालय दापवडी (ता. जावळी, जि. सातारा) या विद्यालयाने आपल्या उच्च गुणवत्तेची परंपरा कायम राखत शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा दिमाखदार कामगिरी केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचा गुणवान विद्यार्थी कु. सार्थक अमोल गोळे याने ‘शिष्यवृत्ती’ प्राप्त करून संस्थेच्या व विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या उज्ज्वल आणि उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात त्याचा भव्य सत्कार करण्यात आला.

​याप्रसंगी बोलताना दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे म्हणाले की, विद्यालयाचा सातत्याने वाढणारा आलेख हा आम्हा सर्वांसाठी भूषणावह आहे. विद्यालयाला अत्याधुनिक भौतिक सुविधा पुरवण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहिलो आहोत. उत्तम भौतिक सुविधा आणि दर्जेदार, पौष्टिक आहार यांमुळे परिसरातील विद्यार्थी शाळेकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत असून शाळेची पटसंख्या कायम टिकून आहे. शिक्षकांचे अपार कष्ट आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांमुळेच आज हे यश साध्य झाले असून ही गुणवत्तेची परंपरा अशीच पुढे कायम टिकावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

​त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. बी. आखाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असते, गरज असते ती फक्त योग्य मार्गदर्शनाची. आमच्या शिक्षकांनी घेतलेले अथक परिश्रम आणि सार्थकने केलेली मेहनत आज फळाला आली आहे. या यशाने शाळेचा आत्मविश्वास अधिक वाढवला असून भविष्यातही शाळा यशाचे नवनवीन टप्पे गाठेल, असा विश्वास त्यांनी दिला.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदाशिव रांजणे, पोपट आप्पा रांजणे यांच्यासह सर्व शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक नितीन घाडगे यांनी केले. सार्थक गोळे याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस संस्थेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers