Home » वाई » शिक्षकी पेशाला काळिमा! वाईत जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाकडून महिला शिक्षिकेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; आरोपीला अटक

शिक्षकी पेशाला काळिमा! वाईत जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाकडून महिला शिक्षिकेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; आरोपीला अटक

पांचगणी न्यूज नेटवर्क

वाई : येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली असून, मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे वाई तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

​खावली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक धर्मेंद्र विष्णू दीक्षित यांनी एका विद्यार्थ्याला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबाबत वर्गशिक्षिका असलेल्या पीडित महिला शिक्षिकेने जाब विचारला होता. तसेच शाळेत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. याचाच राग मनात धरून गुरुवारी (१६ जुलै) सकाळी मुख्याध्यापक दीक्षित यांनी महिला शिक्षिकेला शिवीगाळ करत हातात लाकडी दांडके घेऊन हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी मैदानाकडे पळणाऱ्या शिक्षिकेचा पाठलाग करून आरोपीने त्यांच्या हात, पाय, पाठ आणि मानेवर निर्घृणपणे वार केले. “मी तुमच्या बहिणीसारखी आहे, मला मारू नका,” अशी आर्त विनवणी करूनही आरोपीने मारहाण सुरूच ठेवली.

​या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिला शिक्षिकेवर वाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वाई पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापक धर्मेंद्र दीक्षित याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पोलीस हवालदार किरण इथापे पुढील तपास करत आहेत.

​दरम्यान, या अमानुष घटनेनंतर वाई तालुका शिक्षक संघटना अत्यंत आक्रमक झाली आहे. विद्यार्थ्यांसमोर महिला सहकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीच्या मुख्याध्यापकाला तात्काळ शासकीय सेवेतून बडतर्फ करावे, अन्यथा संपूर्ण तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघटनेने प्रशासनाला दिला आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers