पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्याकडे सोपवला असून, तो तात्काळ मंजूर करण्यात आला आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि गाजावाजा न करता गोळे यांनी थेट राजीनामा सादर केल्यामुळे उपनगराध्यक्षपद अधिकृतपणे रिक्त झाले असून पाचगणीच्या राजकीय वर्तुळात सध्या पुढचा उपनगराध्यक्ष कोण? याची चर्चा रंगली आहे.
पर्यटननगरी पाचगणीमध्ये सध्या विविध विकासकामांचा धडाका सुरू असतानाच उपनगराध्यक्षांनी अचानक पद सोडल्यामुळे शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. प्रकाश गोळे यांनी हा निर्णय वैयक्तिक कारणास्तव घेतला आहे की यामागे काही मोठे राजकीय गणित आहे, यावरून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून किंवा गोळे यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली नसली तरी या घडामोडीमुळे सत्ताधारी गटातील अंतर्गत हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
गोळे यांच्या या अचानक एक्झिटनंतर आता नगरपरिषदेत राजकीय समीकरणांची उलथापालथ सुरू झाली आहे. रिकाम्या झालेल्या उपनगराध्यक्षपदाची सूत्रे आता कोणाच्या हाती जाणार आणि पुढचा उपनगराध्यक्ष कोण असणार, यावरून सर्वच गटांमध्ये अंतर्गत चर्चा आणि मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आगामी काळात नगरपरिषदेतील राजकीय वळण कसे बदलते आणि महत्त्वाच्या उपनगराध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण पाचगणी शहराचे लक्ष लागले आहे.



