पांचगणी न्यूज नेटवर्क
कराड : नीट परीक्षा गैरव्यवहार, शिक्षणातील अनियमितता आणि इतर मागण्यांसह केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे मोर्चातील हजारो विद्यार्थी-तरुणांवर पोलीस व निमलष्करी दलाच्या जवानांनी लाठीमार केला. या घटनेच्या निषेधाचे कराडात देखील पडसाद उमटले. बुधवारी कराड बार असोसिएशनच्या वतीने संपूर्ण एक दिवस काम बंद ठेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बार असोसिएशनच्या वकील सदस्यांच्या वतीने एकत्रित येत कराड अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन करण्यात आले.
यावेळी ॲड. प्रतापराव जानुगडे, ॲड. एम. टी. देसाई, ॲड . विठ्ठलराव राजे भोसले, ॲड. पी. के. घाडगे, ॲड. गौरी पाटील, ॲड. संजय महाडिक, ॲड. शिवाजीराव जाधव, ॲड. शंकर लोकरे, ॲड. राम होगले, ॲड. विद्यारानी साळुंखे, ॲड. अमित जाधव, ॲड. महादेवराव साळुंखे, ॲड. संभाजीराव मोहिते, ॲड. मानसिंगराव पाटील, ॲड. रवींद्र पवार, ॲड. चंद्रकांत कदम यांच्यासह अन्य वकिलांनी आंदोलनात सहभाग घेतला.
एकदिवस काम बंदसह महत्वाचे ठराव
कराड अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयातील सर्व वकिलांच्या वतीने एक दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्यात आले. यावेळी बार असोसिएशनच्या कार्यालयात महत्वाची बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीत दिल्लीतील जंतर मंतरवरील आदोलकांवर केलेल्या लाठीचार्जबाबत निषेध नोंदवण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा जाहीर करण्यात आला.



