Home » पांचगणी » उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पांचगणीच्या ज्ञानगंगा हायस्कूलची गगनभरारी; मरियम पटेल व अथर्व भिलारे यांच्या यशाने शिरपेचात मानाचा तुरा!

उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पांचगणीच्या ज्ञानगंगा हायस्कूलची गगनभरारी; मरियम पटेल व अथर्व भिलारे यांच्या यशाने शिरपेचात मानाचा तुरा!

पाचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी : शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेचा दर्जा सतत उंचावणाऱ्या पाचगणी येथील नामांकित ज्ञानगंगा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (स्कॉलरशिप) पुन्हा एकदा आपल्या यशाचा डंका वाजवला आहे. या अत्यंत मानाच्या व कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत शाळेची विद्यार्थिनी मरियम असिफ पटेल आणि अथर्व किरण भिलारे यांनी दैदिप्यमान यश संपादन करत शाळेच्या उज्ज्वल गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

​गुणवत्तेच्या शिखरावर पोहोचलेल्या या विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची कठोर मेहनत, जिद्द, पालकांचे खंबीर प्रोत्साहन आणि ज्ञानगंगा हायस्कूलच्या शिक्षकांचे अत्यंत अभ्यासपूर्ण व नियोजनबद्ध मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. ज्ञानगंगा हायस्कूलमध्ये केवळ पाठ्यपुस्तक केंद्रित शिक्षण न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित अभ्यासासोबतच विविध स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांची पूर्वतयारी विशेष वर्ग आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून करून घेतली जाते; त्याच दूरदृष्टीचा हा फलित परिणाम असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

​विद्यार्थ्यांच्या या अभिमानास्पद यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा विशेष गौरव करण्यात आला. ज्ञानगंगा हायस्कूल नेहमीच शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांसाठी कटिबद्ध राहिली आहे. या यशाने केवळ शाळेचा नव्हे तर संपूर्ण शहराचा गौरव वाढवला असून इतर सर्व विद्यार्थ्यांनाही आगामी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी मोठी प्रेरणा मिळणार आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी कौतुक करत दोन्ही विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers