पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी, ता. 28 : बेलोशी (ता जावली ) येथे कर्मयोगी संत दत्तात्रय कळंबे महाराज समाधी मंदिर परिसर गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर पूर्णपणे भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणाने फुलून गेला होता. ग्रामस्थ मंडळ बेलोशी आणि श्री संत दत्तात्रय कळंबे महाराज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या शुभमुहूर्तावर विविध धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन करण्यात आले.
गुरुपौर्णिमेच्या दिवसाची सुरुवात समाधी मंदिरात पार पडलेल्या विधीवत महाअभिषेकाने झाली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या भजनाच्या कार्यक्रमात टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष यामुळे संपूर्ण समाधी परिसर भक्तीने न्हावून निघाला होता. दुपारी महाआरती पार पडल्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या प्रसंगी परमपूज्य कळंबे महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आणि कृपाशीर्वाद लाभण्यासाठी बेलोशीसह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
धार्मिक सोहळ्यानंतर समाजाभिमुख परंपरेला जपत प्राथमिक शाळा बेलोशी व दापवडी येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि उपयुक्त भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाने उपस्थितांचे डोळे कौतुकाने भरून आले.
या सोहळ्यासाठी व्यासपीठावर ॲड. तुकाराम बेलोशे, बापू गोळे, हायस्कूलचे मुख्याध्यापक डी बी आखाडे सर, जावली बँकेचे पाचगणी शाखाप्रमुख सुरेश कळंबे, दीपक बेलोशे, शरद बेलोशे, बबनराव शिंदे, अरविंद कळंबे,अंकुश बेलोशे आणि हणमंत बेलोशे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
त्याचप्रमाणे प्रकाश बेलोशे, महादेव बेलोशे, नितीन गावडे, सागर बेलोशे, तुकाराम बेलोशे, दिनकर बेलोशे, नारायण जाधव, शिवाजी बेलोशे, रमेश बेलोशे, यशवंत पवार, शंकर पवार, रामचंद्र बेलोशे, योगेश बेलोशे यांच्यासह ग्रामविकास मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान नितीन गावडे, प्रकाश बेलोशे, बापू गोळे, ॲड. तुकाराम बेलोशे आणि विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे अध्यात्मिक महत्त्व व मानवी जीवनातील गुरूचे स्थान याविषयी अत्यंत मार्मिक व विचारप्रवर्तक मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश बेलोशे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गावडे यांनी सांभाळले, तर शेवटी उपस्थितांचे आभार नारायण जाधव यांनी मानले. दिवसभर चाललेल्या या विविध उपक्रमांमुळे बेलोशी गावात अभूतपूर्व उत्साह आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळाले.



