पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : राज्यात गाजत असलेल्या पेपरफुटी प्रकरणामुळे निराशेपोटी आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी पाचगणी येथे सर्वपक्षीय संघटना, युवक, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य निषेध रॅली आणि कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात संपूर्ण शहर या रॅलीच्या माध्यमातून एकवटल्याचे पाहायला मिळाले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या निषेध रॅलीला अतिशय गंभीर आणि शांततापूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पाचगणी बसस्थानकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. रॅलीच्या अग्रभागी काहींच्या हातात सन्मानाने फडकरणारा तिरंगा झेंडा होता, तर शोकाकुल विद्यार्थ्यांच्या हातात पेपरफुटीमुळे प्राण गमावलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारा मोठा बॅनर धरलेला होता. हातात पेटत्या मेणबत्त्या (कॅण्डल), निषेधाचे फलक आणि हाताला काळ्या फिती बांधून सहभागी झालेल्या आंदोलकांनी शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
रॅलीदरम्यान “पेपरफुटी बंद करा”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे” आणि “पारदर्शक परीक्षा व्यवस्था लागू करा” अशा एकमुखी घोषणांनी पाचगणीचा परिसर दणाणून गेला होता. बसस्थानक परिसरात रॅलीचे रुपांतर सभेत झाल्यानंतर मृत विद्यार्थ्यांना दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांनी राज्य शासनाने या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून मुख्य सूत्रधारांवर अत्यंत कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कायदेशीर व पारदर्शक उपाययोजना करून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी केली.
या सर्वपक्षीय रॅलीत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, बहुसंख्येने युवक, चिंतातुर पालक, शिक्षक आणि हजारो विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. अत्यंत शांततेच्या आणि संयमी मार्गाने काढण्यात आलेल्या या कॅण्डल मार्च व रॅलीतून शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि त्यांच्या भविष्याच्या संरक्षणासाठी पाचगणीकरांनी आपला बुलंद आवाज शासनापर्यंत पोहोचवला.



