Home » सातारा » स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १३ लाखांचा चोरलेला पाण्याचा टँकर २४ तासांत हस्तगत, दोन सराईत चोरटे जेरबंद!

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १३ लाखांचा चोरलेला पाण्याचा टँकर २४ तासांत हस्तगत, दोन सराईत चोरटे जेरबंद!

पांचगणी न्यूज नेटवर्क 

सातारा : फलटण तालुक्यातील पाडेगाव येथून चोरून नेलेला १३ लाख रुपये किमतीचा पाण्याचा टँकर २४ तासांच्या आत हस्तगत करत सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक आणि कौतुकास्पद कारवाई केली आहे. याप्रकरणी अनिकेत सुनील लकडे (वय २५, रा. लकडे वस्ती, पाडेगाव, ता. फलटण) आणि शुभम विनोद जैस्वाल (वय १८, रा. दगडे वस्ती, निरा, ता. पुरंदर, जि. पुणे) या दोन चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आले असून लोणंद पोलीस ठाण्यात दाखल असलेला वाहन चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मौजे पाडेगाव (ता. फलटण) येथील शेती संशोधन केंद्राजवळील मोकळ्या जागेत सगुणामाता कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीचा १३ लाख रुपये किमतीचा पाण्याचा टँकर उभा करण्यात आला होता. २६ ते २८ जुलै दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हा टँकर पळवून नेला. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना तात्काळ तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक तैनात करण्यात आले.

​दरम्यान, २९ जुलै रोजी लिंबखिंड परिसरातील नॅशनल हायवेच्या सर्व्हिस रोडवर दोन संशयित इसम निळ्या-पांढऱ्या रंगाचा टँकर घेऊन तो विक्री करण्यासाठी गिऱ्हाईक शोधत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना मिळाली. माहिती मिळताच तपास पथकाने लिंबखिंड येथे अचानक छापा टाकला. तेथे (MH-12-DT-3139) क्रमांकाचा टाटा कंपनीचा पाण्याचा टँकर आणि त्याच्या शेजारी (MH-53-4944) क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटरसायकलवर अनिकेत लकडे आणि शुभम जैस्वाल हे दोघे बसलेले आढळले.

​पोलिसांनी कागदपत्रांची विचारपूस केली असता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन सखोल व पोलीस खाक्या दाखवत चौकशी केली असता, त्यांनी आपल्या एका सहकाऱ्याच्या मदतीने पाडेगाव येथील शेती संशोधन केंद्राच्या मोकळ्या जागेतून हा टँकर चोरल्याची आणि तो विकण्यासाठी येथे आल्याची कबुली दिली. पोलिसांनी लागलीच १३ लाख रुपयांचा टँकर जप्त करून दोन्ही आरोपींना जेरबंद केले.

​ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि अभिजीत यादव, रोहित फरांदे, पोउपनि परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी तसेच पोलीस अंमलदार संतोष सपकाळ, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडीक, सनी आवटे, हसन तडवी, अमोल माने, राकेश खांडके, सुजित भोसले, अमित झेंडे, मुनीर मुल्ला, अजय जाधव, नवनाथ कदम, मनोज जाधव, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, राजू कांबळे, अरुण पाटील, शिवाजी भिसे, स्वप्नील दोंड व विजय निकम यांच्या पथकाने केली. सातारा पोलिसांच्या या गतिमान कामगिरीबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers