Home » जावळी » झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा शिंदेवाडीला शैक्षणिक साहित्य व संगणक संच भेट; ग्रामस्थांची उपस्थिती

झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा शिंदेवाडीला शैक्षणिक साहित्य व संगणक संच भेट; ग्रामस्थांची उपस्थिती

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी (ता. जावळी) येथे शैक्षणिक साहित्य वाटप व संगणक संच हस्तांतरण सोहळा उत्साहात पार पडला. ठाणे येथील ‘झेप प्रतिष्ठान’ या सामाजिक व सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तर डिजिटल शिक्षणाला गती मिळावी या उद्देशाने शाळेला एक अद्ययावत संगणक संच भेट म्हणून देण्यात आला.

​या सोहळ्याला ‘झेप प्रतिष्ठान’चे संदीप गोळे, सार्थक गोळे यांच्यासह शिंदेवाडी गावातील ज्येष्ठ व प्रमुख नागरिक पांडुरंग शिंदे, गोपाळ शिंदे, धोंडीबा शिंदे, गोपाळ शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. पूजा शिंदे, सौ. प्रतिमा शिंदे आणि सौ. सुनीता शिंदे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता जाधव यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे व ग्रामस्थांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना त्या म्हणाल्या, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची कवाडे उघडी व्हावीत, या दृष्टीने झेप प्रतिष्ठानने दिलेला हा संगणक संच आणि शैक्षणिक साहित्य अतिशय मोलाचे ठरणार आहे. या मदतीमुळे आमच्या विद्यार्थ्यांचा शिकण्याचा उत्साह द्विगुणित होईल, यात शंका नाही.”

​याप्रसंगी मदत सुपूर्द करताना ‘झेप प्रतिष्ठान’चे संदीप गोळे म्हणाले, “ग्रामीण भागातील मुले गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही कमी पडू नयेत आणि त्यांनाही संगणकीय ज्ञानाची गोडी लागावी, याच उद्देशाने आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे. या साहित्याचा योग्य वापर होऊन इथली मुले भविष्यात मोठी झेप घेतील, असा आम्हाला विश्वास आहे.”

​विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि मिळणाऱ्या डिजिटल संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख नितीन फरांदे आणि गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्या वतीने ‘झेप प्रतिष्ठान’चे आणि उपस्थितांचे मनस्वी आभार मानण्यात आले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्था अधिक बळकट होत असून, विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होण्यास मोठी मदत होत असल्याचे मत या वेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers