Home » मुंबई » पश्चिम महाराष्ट्राची जीवनदायिनी असलेल्या कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे ऐतिहासिक नामांतर; राज्य शासनाचा अधिकृत निर्णय

पश्चिम महाराष्ट्राची जीवनदायिनी असलेल्या कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे ऐतिहासिक नामांतर; राज्य शासनाचा अधिकृत निर्णय

पांचगणी न्यूज नेटवर्क

मुंबई / सातारा: पश्चिम महाराष्ट्राचे जीवनदायी वरदान आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत मानल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या विशाल जलसागराचे नामांतर आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून, यामुळे संपूर्ण शिवप्रेमी आणि महाराष्ट्रभरातून आनंदाचे वातावरण व्यक्त होत आहे.

​शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने आणि पराक्रमाने पुनीत झालेल्या या भूमीतील कोयना जलसागराला महाराजांचे नाव मिळावे, यासाठी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या नामांतरासाठी सातत्याने पाठपुरावा करून विनंती केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावाचे गांभीर्य आणि सांस्कृतिक महत्त्व ओळखून त्याला तातडीने मंजुरी दिली.

​शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयानुसार, आता यापुढील काळात राज्य शासनाच्या सर्व अधिकृत पत्रव्यवहारात, प्रशासकीय नोंदींमध्ये, नकाशांत आणि सर्व शासकीय अभिलेखांमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असाच सन्मानपूर्वक उल्लेख केला जाणार आहे.

​या निर्णयानंतर बोलताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “कोयना जलसागर हा केवळ पाण्याचा साठा नसून महाराष्ट्राच्या समृद्धीचा आणि ऊर्जेचा आधारस्तंभ आहे. या जलसागराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणे म्हणजे त्यांच्या महान स्मृतीला वाहिलेली खरी आदरांजली  आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला दिलेले नवे बळ आहे.” त्यांनी या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले. कोयना जलसागराचे हे नवे नामकरण त्याच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला एका नव्या उंचीवर घेऊन जाणारे ठरेल, असा विश्वास सर्वस्तरातून व्यक्त केला जात आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers