Home » पांचगणी » आरोग्यसेवेतील हलगर्जीपणा अजिबात खपवून घेणार नाही; नवनिर्वाचित अध्यक्ष संजय केळघणे यांचा थेट इशारा; पहिल्याच बैठकीत कडक अंमलबजावणीचे आदेश

आरोग्यसेवेतील हलगर्जीपणा अजिबात खपवून घेणार नाही; नवनिर्वाचित अध्यक्ष संजय केळघणे यांचा थेट इशारा; पहिल्याच बैठकीत कडक अंमलबजावणीचे आदेश

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी : “नागरिकांना दर्जेदार, तत्पर आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. ग्रामीण भागातील एकही नागरिक उपचारांपासून वंचित राहता कामा नये, यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणेने पूर्ण जबाबदारीने काम केले पाहिजे. रुग्णांच्या जीवाशी खेळणारा किंवा रुग्णसेवेत जरासाही निष्काळजीपणा दाखवणारा कर्मचारी असो वा अधिकारी, त्यांचा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. सेवेत त्रुटी आढळल्यास थेट कठोर कारवाई केली जाईल,” असा अत्यंत कडक आणि आक्रमक इशारा जिल्हा परिषद सदस्य तथा जन आरोग्य समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय केळघणे यांनी दिला.

​अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयोजित पहिल्याच आढावा बैठकीत केळघणे यांनी आक्रमक भूमिका घेत आरोग्य यंत्रणेचे कान उघडले. बैठकीपूर्वी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील प्रत्यक्ष कामकाजाची आणि सुविधांची झाडाझडती घेतली. त्यानंतर पार पडलेल्या जन आरोग्य समितीच्या पहिल्याच मासिक सभेत आरोग्य केंद्रातील औषधसाठा, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, स्वच्छता, मातृ-बाल संगोपन, लसीकरण आणि आपत्कालीन सेवांचा सखोल आढावा घेण्यात आला.

​या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील तीन उपकेंद्रे आणि तब्बल २९ गावांतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. दुर्गम व डोंगराळ भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचण्यासाठी आशा सेविकांनी नियमित घरोघरी जाऊन गरोदर माता, बालके, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची कसून तपासणी करावी, असे कडक निर्देश देण्यात आले. विशेष म्हणजे, अंथरुणाला खिळलेल्या असहाय्य रुग्णांना उपचारासाठी आरोग्य केंद्रात चकरा मारायला लावण्याऐवजी त्यांना थेट घरपोच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे विशेष नियोजन करण्याचे स्पष्ट आदेश यावेळी देण्यात आले.

​ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा बोजवारा उडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांवरही बैठकीत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णाना हाल सोसावे लागत असल्याने ही रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासनाकडे उच्चस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

​या बैठकीस जन आरोग्य समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय केळघणे, सहअध्यक्ष डॉ. प्रदून्य बुलाख, सदस्य सचिव तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. मिथिला बेलोशे, सदस्य राम गोळे, अंकुश बावळेकर, गणेश धनावडे, बिरामणे, तमन्ना काझी, स्नेहल गुप्ते, विशाल चव्हाण, हर्षवर्धन मोरे, डॉ. विशाल टकले यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. पहिल्याच बैठकीत अध्यक्षांच्या आक्रमक आणि कडक भूमिकेमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून, आरोग्य व्यवस्था रुळावर आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers