पांचगणी न्यूज नेटवर्क
वाई:वाई-पांचगणी मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या आणि वळणावळणाच्या पसरणी घाटात आखाडी जत्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा प्रचंड बोजवारा उडाला आहे. जत्रेमुळे घाटात वाहनांची तुफान गर्दी झाली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यामुळे पर्यटकांसह स्थानिक वाहनचालक आणि भाविक या महाकोंडीत तासनतास अडकून पडले आहेत.
आखाडी जत्रेनिमित्त दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. घाटातील अरुंद वळणे, रस्त्याच्या दुतर्फा झालेली वाहनांची अनधिकृत पार्किंग आणि त्यातच पुढे जाण्याच्या घाईत होणारी ओव्हरटेकिंग यामुळे या कोंडीत अधिकच भर पडली आहे. घाटात वाहनांचा चक्का जाम झाल्याने उकाड्यामुळे वाहनातील प्रवासी, विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.
एकीकडे आखाडी जत्रेचा मोठा उत्साह असताना, दुसरीकडे मात्र या परिसरात वाई पोलिसांचे कसलेही नियंत्रण अथवा नियोजन दिसत नसल्याचे चित्र आहे. जत्रेसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी घाटात आणि गर्दीच्या पॉईंट्सवर पुरेशा पोलीस बंदोबस्ताची गरज होती. मात्र, प्रत्यक्ष घाटात वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस यंत्रणाच गायब असल्याने ही गंभीर परिस्थिती ओढावली असल्याचा आरोप वाहनचालक करत आहेत.
वाई पोलीस प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पसरणी घाटात अतिरिक्त पोलीस कर्मचारी आणि वाहतूक पोलीस तैनात करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाच्या या ढिम्म कारभारावर आणि दुर्लक्षावर सध्या खोळंबलेल्या वाहनचालक व प्रवाशांमधून तीव्र संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे.



