Home » पांचगणी » भोसे व पांगारी येथे भात लागवडीला वेग; कृषी विभागाच्या ‘क्रॉपसेप’ शेतीशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन ​पांगारी व भोसे परिसरात शेतीकामे युद्धपातळीवर; शास्त्रशुद्ध पीक व्यवस्थापनाचे कृषी अधिकाऱ्यांकडून धडे

भोसे व पांगारी येथे भात लागवडीला वेग; कृषी विभागाच्या ‘क्रॉपसेप’ शेतीशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन ​पांगारी व भोसे परिसरात शेतीकामे युद्धपातळीवर; शास्त्रशुद्ध पीक व्यवस्थापनाचे कृषी अधिकाऱ्यांकडून धडे

पाचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी : यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे भोसे व पांगारी परिसरात भात लागवडीला काहीसा विलंब झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी लागवडीच्या कामांना मोठा वेग दिला आहे. सध्या दोन्ही गावांमधील शेतांमध्ये रोपलागवड, मशागत आणि इतर शेतीकामे युद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

​या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘क्रॉपसेप’ (CropSAP) कार्यक्रमांतर्गत भोसे व पांगारी येथे थेट शेताच्या बांधावर शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी माया लेंडे, उप कृषी अधिकारी रणजीत शिंदे आणि सहाय्यक कृषी अधिकारी संतोष जगताप यांनी उपस्थित शेतकऱ्यांना भात पिकाचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन, संतुलित खतांचा वापर, कीड व रोग नियंत्रण, पाणी व्यवस्थापन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

​या वेळी माती परीक्षणाच्या अहवालानुसार नत्र, स्फुरद व पालाश खतांचा संतुलित वापर करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला देण्यात आला. पिकाच्या योग्य वाढीसाठी आणि फुटवे फुटण्याच्या काळात गरजेनुसार युरियाचे वरखत देणे, तसेच झिंकची कमतरता रोखण्यासाठी शिफारशीनुसार झिंक सल्फेटचा वापर करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. शेतात कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करून वेळेवर योग्य नियंत्रण उपाययोजना केल्यास भाताच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

​या शेतीशाळेस पांगारी गावचे माजी सरपंच संदीप पांगारे यांच्यासह रामदास गोळे, मंदा गोळे, प्रमिला गोळे, सुगंध गोळे, आनंदा पांगारे, गणेश पांगारे, संतोष पांगारे, गणेश दिलीप पांगारे, सिताराम गोळे, अनुराधा पांगारे, दिपाली पांगारे तसेच भोसे व पांगारी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​उशिरा आलेल्या पावसामुळे लागवड लांबली असली तरी कृषी विभागाचे मोलाचे मार्गदर्शन आणि योग्य नियोजनाच्या बळावर यंदा भाताचे पीक उत्तम येईल आणि उत्पादनात चांगली वाढ होईल, असा ठाम विश्वास पांगारी व भोसे परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers