पांचगणी न्यूज नेटवर्क
वाई:इंडियन डेंटल असोसिएशनच्या (IDA) वाई-पाचगणी शाखेचा नूतन पदाधिकारी पदस्थापना सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. दंतचिकित्सा क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ दंतवैद्य आणि विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्यात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला, तसेच दंतआरोग्य जनजागृतीचा नवा संकल्प सोडला.
सुप्रसिद्ध कॉस्मेटिक डेंटिस्ट डॉ. राजेंद्र सोपे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन स्वाती हेरकळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. पराग लांबाडे, नवनिर्वाचित सचिव डॉ. अमर कित्तूरकर आणि माजी अध्यक्ष डॉ. मोहन झगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या स्वागताने सोहळ्याची सुरुवात झाली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात आणि मनोगतात नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. पराग लांबाडे व सचिव डॉ. अमर कित्तूरकर यांनी शाखेच्या भावी वाटचालीचा आराखडा मांडला. दंतचिकित्सकांच्या व्यावसायिक हिताचे जतन करण्यासोबतच वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील ग्रामीण तसेच निमशहरी भागात दंतआरोग्याविषयी व्यापक जनजागृती मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळांमध्ये मोफत दंतचिकित्सा शिबिरे, मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि आधुनिक दंतवैद्यकीय तंत्रज्ञानावर कार्यशाळा आयोजित करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘आयडीए सातारा’ शाखेतील ज्येष्ठ व अनुभवी दंतवैद्यांचा करण्यात आलेला विशेष सत्कार. दंतचिकित्सा क्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा देऊन समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉ. प्रकाश चौकवले, डॉ. श्रीराम परांजपे, डॉ. प्रमोद कोदे, डॉ. आर. बी. देशपांडे, डॉ. विजयकुमार श्रीवास्तव, डॉ. अशोक वोरा आणि डॉ. विश्वास पुराणिक या मार्गदर्शक डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते भावूक वातावरणात सन्मान करण्यात आला. या ज्येष्ठ डॉक्टरांचे कार्य नव्या पिढीतील दंतचिकित्सकांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन उपस्थितांनी केले.
प्रमुख पाहुण्या रोटेरियन स्वाती हेरकळ यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा देताना, वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्त्वावर भर दिला. या प्रसंगी विविध वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी IDA वाई-पाचगणी शाखेच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.



