Home » पांचगणी » क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे वंशज डॉ. दिलीप नेवसे यांना ‘राष्ट्रीय आदर्श समाजरत्न’ पुरस्कार प्रदान

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे वंशज डॉ. दिलीप नेवसे यांना ‘राष्ट्रीय आदर्श समाजरत्न’ पुरस्कार प्रदान

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे वंशज तथा नायगाव-सातारा येथील भूमिपुत्र डॉ. दिलीप गणपत नेवसे यांना ‘राष्ट्रीय आदर्श समाजरत्न गौरव पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. बेळगाव जिल्हा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड २०२६ अंतर्गत या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

​कोल्हापूर येथील ताराबाई पार्कस्थित हॉटेल रिजेन्ता हॉलमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात हा सोहळा पार पडला. मिसेस इंडिया, यशस्वी उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी शिंत्रे आणि संजय घोडावत कॉलेजच्या एचओडी प्रा. रईसा मुल्ला यांच्या शुभहस्ते डॉ. दिलीप नेवसे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, मेडल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. महाराष्ट्रासह कर्नाटक व गोव्यातील अनेक दिग्गज साहित्यिक आणि मान्यवरांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

​डॉ. दिलीप नेवसे यांनी सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी क्षेत्रात दिलेल्या प्रदीर्घ योगदानाची दखल घेऊन त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे मोलाचे कार्य डॉ. नेवसे हे सातत्याने करत आहेत.

​या सोहळ्याचे अध्यक्षस्थान महात्मा फुले कॉलेज महागावचे प्राचार्य डॉ. पांडुरंग पाटील यांनी भूषविले, तर प्रसिद्ध वक्ते डॉ. प्रकाश कदम यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी दिया हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजय पाटील, मुंबईचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शांताराम कारंडे, संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे (पत्रकार) यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

​डॉ. नेवसे यांना हा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सातारा जिल्हा, नायगाव परिसर आणि संपूर्ण शैक्षणिक व सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही त्यांच्या हातून असेच राष्ट्र उभारणीचे आणि समाजोपयोगी कार्य घडत राहो, अशा शुभेच्छा या वेळी उपस्थितांनी दिल्या.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers