Home » पांचगणी » अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास कॉलेजमध्ये ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांच्या प्रबोधनात्मक नाटकाने व कव्वालीने जिंकली मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास कॉलेजमध्ये ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांच्या प्रबोधनात्मक नाटकाने व कव्वालीने जिंकली मने

मानवतेचा संदेश देत अ‍ॅस्टॉन आणि नचिकेतासच्या विद्यार्थ्यांनी सजवला सांस्कृतिक सोहळा; शीरखुरम्याने गोडवा वाढवला

​पांचगणी न्यूज नेटवर्क / प्रमोद रांजणे

पांचगणी :  येथील नामांकित अमर एज्युकेशनल अँड सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संचलित अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) विशेष सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत पवित्र आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रबोधनात्मक नाटक आणि सुश्राव्य कव्वाली उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरली.

​कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठणाने व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या जीवन चरित्रावर आधारित एक अत्यंत प्रभावी नाटक सादर केले. समाजात शांतता, बंधुभाव आणि गरिबांना मदत करण्याचा संदेश देणाऱ्या या नाटकात विद्यार्थ्यांनी केलेल्या हुबेहूब अभिनयाने उपस्थितांचे डोळे पाणावले. नाटकानंतर पारंपरिक पोशाखात सज्ज झालेल्या विद्यार्थी गायकांच्या संचाने ‘नाअत’ आणि सुफी कव्वाली सादर करून सभागृहात रंगत आणली. “भर दो झोली मेरी” या कव्वालीला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

​या वेळी मार्गदर्शन करताना सौ. खरात मॅडम यांनी, पैगंबर मोहम्मद यांचे विचार संपूर्ण मानवजातीला शांततेचा आणि एकतेचा मार्ग दाखवणारे आहेत, असे प्रतिपादन केले. तर उपशिक्षिका सौ. साजिदा पठाण यांनी, अशा सर्वसमावेशक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक एकतेची व बंधुभावाची भावना दृढ होते असे सांगत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

​या सणानिमित्त सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थितांना विशेष शीरखुरमा व मिठाई वाटून आनंद द्विगुणित करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, हॉस्टेल रेक्टर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमारी हीना कांबर हिने केले, तर गजाला खान यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers