पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : पाचगणी शहरातील मुख्य शॉपिंग सेंटर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सुलभ शौचालयाची मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या या नवीन सुलभ शौचालयाचा भूमिपूजन समारंभ आज मान्यवरांच्या हाती पार पडला. नगरपरिषदेत सत्ताधारी असलेल्या ‘पाचगणी शहर विकास आघाडी’च्या माध्यमातून ही महत्त्वाची वचनपूर्ती करण्यात आली आहे.
पाचगणी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने शॉपिंग सेंटर परिसरात रोज शेकडो पर्यटक, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, येथे पुरेशी स्वच्छतागृह सुविधा नसल्याने सर्वांचीच मोठी गैरसोय होत होती. ही गरज लक्षात घेऊन नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्या नेतृत्वाखालील नगरपरिषद प्रशासनाने या कामाला प्राधान्य दिले आणि पर्यटन निधीतून या आधुनिक सुलभ शौचालयाची निर्मिती निश्चित केली.
उभारण्यात येणाऱ्या या सुलभ शौचालयामध्ये पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी ३ युरिनल्स आणि २ सीटची अद्ययावत व्यवस्था करण्यात येणार आहे. हे शौचालय ‘पे अँड यूज’ तत्त्वावर नाममात्र दरात उपलब्ध असेल. शौचालयाची नियमित स्वच्छता आणि देखभाल योग्य रीतीने व्हावी, तसेच स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती राहावी, या दृष्टीने ही नाममात्र शुल्काची व्यवस्था लागू करण्यात येणार आहे.
नगरपरिषद प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शॉपिंग सेंटरमधील व्यावसायिक, नागरिक आणि पर्यटकांनी समाधान व्यक्त केले असून, अनेक वर्षांची गैरसोय आता दूर होणार आहे. नागरिक व पर्यटकांना सर्व मूलभूत सुविधा उच्च दर्जाच्या उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी दिली.
या भूमिपूजन सोहळ्यास नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, उपनगराध्यक्षा सौ. माधुरी कासुर्डे, मुख्याधिकारी पंडित पाटील, श्री घाटजाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक शेखर कासुर्डे, बांधकाम सभापती राजेंद्र पारठे, नगरसेवक नारायण बिरामणे, महेश खांडके, अमित कांबळे, आकाश बगाडे, प्रवीण बोधे, गणेश कासुर्डे, नगरसेविका सुप्रिया महेश माने, विमल भिलारे, शिल्पा माने, अमय भिलारे, नगर अभियंता अभिजित सोनावले, सल्लागार अभियंता निखिल पवार यांच्यासह परिसरातील व्यावसायिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



