Home » पांचगणी » जावली तालुक्यात माकडाचा उच्छाद! काटवली व बेलोशीत दहशत; लहान मुलांसह नागरिकांवर हल्ले, वनविभागाने जेरबंद करण्याची मागणी

जावली तालुक्यात माकडाचा उच्छाद! काटवली व बेलोशीत दहशत; लहान मुलांसह नागरिकांवर हल्ले, वनविभागाने जेरबंद करण्याची मागणी

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी : जावली तालुक्यातील काटवली आणि बेलोशी परिसरात गेल्या पाच-सहा महिन्यांपासून एका मोठ्या माकडाने प्रचंड उच्छाद मांडला असून संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलातून वाट भरकटलेले हे माकड थेट नागरी वस्तीत घुसून घरात नासधूस करत असून, लहान मुले व महिलांवर प्राणघातक हल्ले चढवत आहे. या हिंस्त्र माकडाचा तात्काळ बंदोबस्त करून त्याला जेरबंद करावे, अशी आक्रमक मागणी दोन्ही गावांतील संतप्त ग्रामस्थांमधून केली जात आहे.

 

​काटवली व बेलोशी ही गावे निसर्गाच्या कुशीत वसलेली असून, गेल्या काही महिन्यांपासून एका भल्यामोठ्या माकडाने या भागात तळ ठोकला आहे. हे माकड केवळ खाण्यापिण्याच्या वस्तूंची नासधूस करून थांबत नसून, रस्त्याकाठी उभ्या असलेल्या वाहनांचेही मोठे नुकसान करत आहे. सध्या शेतीचा हंगाम अंतिम टप्प्यात किंवा ऐन गर्दीत असताना, हे माकड थेट शेतांमध्ये घुसून पिकांची नासाडी करत आहे. यामुळे शेतात काम करणारे शेतकरी, महिला आणि मजुरांमध्ये प्रचंड भीतीचे सावट पसरले आहे.

​सर्वात गंभीर बाब म्हणजे, घराबाहेर खेळणाऱ्या लहान मुलांच्या अंगावर हे माकड थेट धावून जात असून अनेकांना जखमी केले आहे. माकडाच्या या हिंस्त्र स्वरूपामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून, घराची दारे-खिडक्या बंद करून राहण्याची वेळ स्थानिक रहिवाशांवर आली आहे. नैसर्गिक अधिवासातील अन्न व पाण्याचा तुटवडा, तसेच वाढते मानवी अतिक्रमण यामुळे ही वन्यजीव नागरी वस्तीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.

 

​नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असल्याने वनविभागाने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने पावले उचलावीत. या भागात तात्काळ पिंजरा लावून या माकडाला सुरक्षितपणे जेरबंद करावे आणि त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करावे, अशी ठाम आणि आक्रमक मागणी काटवली व बेलोशी येथील ग्रामस्थांनी ‘सकाळ’शी बोलताना केली आहे. वनविभाग आता यावर कधी कारवाई करतो, याकडे संपूर्ण जावली तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

शालेय विद्यार्थ्यांमध्ये माकडाची मोठी धास्ती!

​”काटवली आणि बेलोशी या दोन्ही गावांत या माकडाने घातलेल्या उच्छादामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज सकाळी मुले शाळेत जाताना हे माकड अचानक अंगावर धावून येते की काय, या धास्तीने विद्यार्थी हादरले आहेत. पालकांनाही आपल्या पाल्यांना सुरक्षितपणे शाळेत पाठवणे अत्यंत धोक्याचे आणि चिंतेचे वाटत आहे. मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वनविभागाने कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता या माकडाला तातडीने पिंजरा लावून जेरबंद करावे.”

​— उमेश बेलोशे (सरपंच, बेलोशी)

 

चौकट

शेतात खुरापणीसाठी जाणाऱ्या महिलांमध्ये घबराट!

​”सध्या शेतात खुरापणीचा हंगाम सुरू असून महिला शेतमजूर मोठ्या संख्येने शेतात काम करण्यासाठी जात आहेत. मात्र, हे माकड अचानक शेतात घुसून पिकांची नासधूस करत थेट महिलांच्या अंगावर धावून जात आहे. माकडाच्या या हैदोसामुळे शेतात काम करणाऱ्या महिला कमालीच्या हादरल्या असून त्यांच्यात प्रचंड घबराट पसरली आहे. भीतीपोटी शेतातील कामे पूर्ण करणेही अशक्य झाले असून, दैनंदिन रोजगाराचा आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने या माकडाचा तात्काळ बंदोबस्त करावा.”

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers