पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : आपल्या धारदार आणि अभ्यासू पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे ‘दैनिक सकाळ’चे पाचगणी येथील ज्येष्ठ पत्रकार, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तथा सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुनील गंगाराम कांबळे (वय ६७) यांचे आज (मंगळवार) सकाळी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने पाचगणीसह संपूर्ण महाबळेश्वर तालुका आणि सातारा जिल्ह्यातील पत्रकारिता, सामाजिक व राजकीय क्षेत्रात तीव्र शोककळा पसरली असून एक अभ्यासू, अभिमानी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
सुनील कांबळे यांनी आपल्या दीर्घ पत्रकारितेच्या प्रवासात ‘दैनिक सकाळ’च्या माध्यमातून पाचगणी व परिसरातील नागरी समस्या, पर्यटन, पर्यावरण आणि स्थानिक लोकांचे प्रश्न अतिशय प्रखरतेने मांडले. केवळ समस्या मांडण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवून समाजाला ठोस दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या कार्यकाळात पाचगणी रोटरी क्लबला अनेक उत्कृष्ट पुरस्कार मिळाले. प्रसिद्ध ‘पाचगणी फेस्टिव्हल’च्या यशस्वी आयोजनातही त्यांचा नेहमीच पुढाकार आणि सक्रिय सहभाग असायचा. सध्या ते रोटरीच्या ‘सिल्व्हर ओक’ या विशेषांकाच्या संपादनाची धुरा सांभाळत होते.
कांबळे यांना सामाजिक व राजकीय वारसा लाभला होता. पाचगणीचे माजी उपनगराध्यक्ष दिवंगत गंगाराम कांबळे यांचे ते चिरंजीव, तर माजी नगरसेविका रेखा कांबळे यांचे ते पती होत. तसेच पाचगणी नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अमित कांबळे यांचे ते चुलते होत. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि माध्यम जगतात मोठा मित्रपरिवार जोडला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, दोन विवाहित मुली, एक मुलगा आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी सायंकाळी ५. 30 वाजता पाचगणी येथील वैकुंठधामात (स्मशानभूमीत) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्ह्यातील पत्रकार, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी कांबळे निवासस्थानी धाव घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.



