पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : समग्र शिक्षा अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या निपुण भारत अभियानाचे लेखापरीक्षण करण्यासाठी मुंबई येथील प्रधान लेखाकार कार्यालयाच्या केंद्रीय पथकाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिंगर येथे सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. महाबळेश्वरसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील लोकसहभागातून उभारलेली, अद्ययावत भौतिक सुविधांनी सुसज्ज असलेली ही शाळा पाहून तपासणी पथकाने समाधान व्यक्त करत शाळेच्या कामगिरीची प्रशंसा केली.
या तपासणी पथकामध्ये वरिष्ठ लेखापरीक्षक बंडा श्रीनिवासालू, सहाय्यक लेखापरीक्षक दत्ता गायकवाड आणि सहाय्यक लेखापरीक्षक सचिन भावसार यांचा समावेश होता. निपुण भारत उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या ७६ निकषांच्या आधारे पथकाने शाळेच्या कागदपत्रांची व अभिलेख्यांची सखोल तपासणी केली. सर्व अभिलेख अत्यंत सुटसुटीत, पारदर्शक आणि उत्तम प्रकारे जतन करून ठेवल्याचे या वेळी दिसून आले.
शाळेत उभारण्यात आलेले स्वतंत्र ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, सर्व डिजिटल वर्ग खोल्या आणि विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेले उल्लेखनीय यश पाहून अधिकाऱ्यांनी विशेष गौरवोद्गार काढले. निपुण भारत अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शाळेत राबवले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम अत्यंत प्रभावी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
शाळेचा वाढता शैक्षणिक दर्जा आणि लोकसहभागातून झालेला विकास विचारात घेऊन पथकाने भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी मुख्याध्यापक संतोष पारठे, पदवीधर शिक्षक महेश कांबळे, उपशिक्षक रुपाली इथापे, सुनीता सावंत आणि विजय क्षीरसागर यांच्या शैक्षणिक योगदानाची उपस्थितांनी प्रशंसा केली. या प्रसंगी खिंगर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रदीप दाभाडे, भिलार केंद्राचे केंद्रप्रमुख संजय पारठे आणि केंद्रप्रमुख चंद्रकांत जंगम उपस्थित होते.



