Home » जावळी » जावळी तालुक्यात ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकून शेतमजुराचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृत्यू!

जावळी तालुक्यात ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडकून शेतमजुराचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृत्यू!

पांचगणी न्यूज नेटवर्क

​मेढा : जावळी तालुक्यातील राधाकृष्णनगर (बामणेवाडी) येथील ‘आनंद अ‍ॅग्रो’ फार्महाऊसवर शेतातील नांगरटी व रोटर मारण्याचे काम सुरू असताना एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. ट्रॅक्टरच्या रोटर मशीनमध्ये अडकून ५२ वर्षीय शेतमजुराचा जागीच छिन्नविछिन्न अवस्थेत मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली असून, या दुर्घटनेने जावळी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

​करहर औट पोस्ट पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी कि रामभवन रामसजीवन वर्मा (वय ५२, मूळ रा. भैसोंधा, ता. भरतपूर, जि. चित्रकूट, उत्तर प्रदेश; सध्या रा. राधाकृष्णनगर, पो. वालुथ, ता. जावळी, जि. सातारा) असे या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतमजुराचे नाव आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राधाकृष्णनगर येथील गुलाब आनंदराव भिलारे यांच्या मालकीच्या ‘आनंद अ‍ॅग्रो’ फार्महाऊसवरील गट क्रमांक ४१५ मधील शेतात शुक्रवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास काम सुरू होते. सहकारी शेतमजूर रामलू भिमय्या दंडू यांनी रामभवन वर्मा यांना शेतात ट्रॅक्टरने रोटर मारण्याचे काम सांगितले होते. त्यानुसार वर्मा हे शेतात रोटर फिरवण्याचे काम करत होते.

​दुपारी १:१५ वाजण्याच्या सुमारास शेजारीच काम करणाऱ्या रामचंद्र मेंगडे या दुसऱ्या शेतमजुराला ट्रॅक्टर चालू स्थितीत उभा असल्याचे दिसले, मात्र चालक सीटवर रामभवन वर्मा दिसले नाहीत. त्यांनी संशय आल्याने त्वरित रामलू दंडू यांना ही माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी ट्रॅक्टरकडे धाव घेऊन पाहिले असता रोटर मशीनच्या पात्यांमध्ये रामभवन वर्मा अडकलेले आढळून आले. रोटर फिरत असल्याने त्यांच्या शरीराचे लचके तुटून अस्ताव्यस्त तुकडे झाले होते आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.

​चालू स्थितीत असलेल्या रोटरमध्ये अडकलेला कचरा किंवा गवत काढण्यासाठी वर्मा हे मागे गेले असावेत आणि अचानक रोटरच्या तावडीत सापडल्याने हा भयानक अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी रामलू भिमय्या दंडू यांनी दिलेल्या खबरी जबाबावरून मेढा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers