पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील श्रद्धास्थान व प्रसिद्ध धार्मिक केंद्र असलेल्या श्री घाटजाई देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक तथा श्री घाटजाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष शेखर (दाजींनाना) कासुर्डे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवड घोषित झाल्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री घाटजाई देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अजित विष्णू कासुर्डे यांच्या दुर्दैवी निधनाने अध्यक्षपद रिक्त झाले होते. या रिक्त पदावर नवीन अध्यक्षांची निवड करण्यासाठी देवस्थान ट्रस्टची विशेष सभा आज आयोजित करण्यात आली होती. सभेच्या प्रारंभी दिवंगत अजित कासुर्डे यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत उपस्थितांनी शेखर कासुर्डे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला सर्व विश्वस्त व सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा देत बिनविरोध मंजुरी दिली.
नवनिर्वाचित अध्यक्ष शेखर कासुर्डे हे पाचगणीच्या राजकीय, सामाजिक आणि नागरी विकासातील एक अभ्यासू व अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, “श्री घाटजाई मंदिर हे पाचगणी शहर आणि परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानला पर्यटन व धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. येत्या काळात देवस्थान परिसराचे सौंदर्यकरण, भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि पाचगणीला भेट देणाऱ्या देश-परदेशातील पर्यटकांना आकर्षित करेल असा जागतिक दर्जाचा निसर्गरम्य आणि पर्यटन स्थळाला साजेसा विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध राहू.”
या सभेला श्री घाटजाई देवस्थान ट्रस्टचे सर्व प्रमुख विश्वस्त, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेखर कासुर्डे यांच्या बिनविरोध निवडीमुळे पाचगणी शहरासह संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



